अभिनेता अंशुमन विचारेची (Anshuman Vichare) मराठीतील प्रसिद्ध अभिनेता, विनोदवीर, निवेदक आणि निर्माता असा हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. मराठी सिनेसृष्टीत तो जितका प्रसिद्ध आहे त्यापेक्षा अधिक त्याची लाडकी लेक अन्वी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. अंशुमन नेहमी आपल्या सोशल मीडिया हँडलवर मुलगी अन्वीसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांशी शेअर करत असतो. यामधील तिचा निरागसपणा, तिचे बोबडे बोल पाहून चाहतेसुद्धा यास फार पसंती देतात.
नुकतीच गुढीपाडव्याच्या दिवशी अंशुमनने इन्स्टाग्रामवर अन्वीचा एक फोटो शेअर केला. त्यामध्ये ती एका बाळाला मांडीवर घेतल्याचं दिसत होतं. या फोटोसोबत अंशुमनने एक लिंक दिली होती. तसेच या पोस्टद्वारे त्याने अन्वीला भाऊ आला असून त्याला मुलगा झाल्याची गोड बातमी दिली होती. त्यानंतर त्याची ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.
अंशुमनने ही गुड न्यूज शेअर करताच त्याचावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. परंतु आता अंशुमनची पत्नी पल्लवीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती सांगत आहे की, हा सगळा एप्रिल फूलचा प्लॅन होता आणि त्यांना अन्वी ही एकच मुलगी आहे. तसेच त्यांचा हा प्लॅन त्यांना महागात पडल्याचे पल्लवी या व्हिडिओत सांगत आहे.
पल्लवीने युट्यूबवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती सांगत आहे की, ‘नमस्कार सर्वांना. १ एप्रिल रोजी गंमत म्हणून आम्ही एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओद्वारे आम्ही अन्वीला भाऊ झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पण या व्हिडिओमुळे आता अंशुमनला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे’.
पल्लवीने पुढे सांगितले की, ‘आम्हाला मुलगा झाला नाही. फक्त एक गंमत म्हणून हा व्हिडिओ शेअर केला होता. याबाबत अंशुमनला काहिच माहिती नव्हतं. पण व्हिडिओ शेअर केल्यानंतर आम्ही त्याला सांगितलं होतं की, आम्ही या पद्धतीने व्हिडिओ केला आहे आणि जर तुला फोन किंवा मेसेजेस येत असतील तर त्यांना फक्त एप्रिल फूल असल्याचे सांग’.
‘आम्हाला कोणालाही फसवण्याचा किंवा दुसरा कोणताच उद्देश नव्हता. एक गंमत म्हणून आम्ही हा व्हिडिओ केला. पण आता असं झालंय की, अंशुमनला अनेक फोन आणि मेसेजेस येत आहेत. त्यामुळे याचा अंशुमनला खूप त्रास होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होण्यासोबतच यासंदर्भात अनेक बातम्यासुद्धा समोर आल्या. पण आता आम्ही केलेल्या या व्हिडिओमुळे तुमचा एप्रिल फूल केलंय की माझा एप्रिल फूल झाला, हे मला कळेनासं झालंय’.
पल्लवीने म्हटले की, ‘मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की, आम्हाला बाळ झालेला नाही. आम्हाला अन्वी एकच मुलगी आहे. मी आणि अंशुमनने सुरुवातीलाच ठरवलं होतं की, आम्हाला मुलगा किंवा मुलगी जो कोणी असेल तो एकच बाळ असेल. त्यामुळे आमचा दुसऱ्या बाळाबाबत कोणताच विचार नाही’.
यावेळी व्हिडिओमुळे होणाऱ्या त्रासाबाबत सांगताना पल्लवीने म्हटले की, ‘अंशुमनचा या सर्वांत काहीही सहभाग नसताना त्याला नाहक त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करत आहे की, कृपया करून अंशुमनला फोन कॉल्स किंवा मेसेज करणे बंद करा. याचा त्याला खूप त्रास होत आहे’. दरम्यान, पल्लवीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
..तर लोकं मला चपलीने मारतील; अभिनेता शरद केळकरने व्यक्त केली भिती
लोकांना वाटले होते की माझं करिअर इथेच संपलं पण.., kaun pravin tambe च्या यशानंतर श्रेयसचा खुलासा
रात्रभर त्रास सहन करत राहिली भारती सिंग, लेबर पेन होत असतानाही ‘या’ कारणामुळे केला व्हिडीओ शुट