दुसरीच्या मुलाने पोलीस स्टेशन गाठत केली शिक्षकाविरूद्ध तक्रार, म्हणाला त्यांना अटकच करा..

मुलांना योग्य ती शिस्त लागावी, त्यांनी अभ्यास करावा यासाठी आधी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देत होते. मात्र आता ही पद्धत बऱ्यापैकी लुप्त झाली आहे. शिक्षकांनी मुलांना हात सुद्धा लावणं आता गुन्हा ठरत आहे. अनेक पालक देखील मुलांना मारण्यासाठी शिक्षकांना परवानगी देत नाहीत. मुलं देखील शिक्षकांना घाबरत नाहीत असं चित्र सध्या दिसते.

शाळेत जाणारी लहान मुलं निरागस असतात. त्यात काही मुलं आई वडिलांच्या लाडाने वाढलेली असतात, त्यांना इतर कोणी काही बोलले तरी प्रचंड संताप येतो, मग इतरांचा मार खाणं तर लांबच. अशाच एका मुलाचा एक मजेदार किस्सा समोर आला आहे. वाचून तुम्ही देखील या लहान मुलाच्या निरागसतेवर हसाल.

इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षकाची तक्रार घेऊन पोलिसांकडे धाव घेतली. त्याने पोलीस कर्मचाऱ्याला सांगितले की, गुरुजी मला खूप मारतात, त्यांना अटक करा. दुसरीत शिकणाऱ्या मुलाकडे पाहून पोलीस कर्मचारी अवाक झाले.

हे प्रकरण तेलंगणातील महबूबाबादचे आहे. तेलंगणातील महबुबाबाद जिल्ह्यातील बायराम मंडल येथील एका खासगी शाळेत इयत्ता दुसरीत शिकणारा अनिल नाईक पोलीस ठाण्यात पोहोचला. मुलाला पोलीस ठाण्यात येताना पाहून महिला पोलीस निरीक्षक रमादेवी यांनी त्याला त्यांच्याजवळ बोलावले आणि तू का आलास? असं विचारले.

त्यावर मुलगा अनिलने शिक्षकाने त्याला मारल्याचे सांगितले. शिक्षकांनी तुला का मारले? असे त्याला विचारले असता म्हणाला, मी अभ्यास न केल्याने त्यांनी मला मारले. यानंतर पोलीस निरीक्षकांनी विचारले की, त्या शिक्षकांनी इतर विद्यार्थ्यांनाही मारलं का? त्यावर मुलगा म्हणाला, की शिक्षक फक्त मलाच मारतात.

मुलाने पोलीस कर्मचाऱ्याला शिक्षकाविरोधात तक्रार लिहिण्यास सांगितलं. मुलाचं बोलणं ऐकून महिला पोलीस निरीक्षक अवाक झाली. मुलाची तक्रार तिनं लक्षपूर्वक ऐकली. यानंतर मुलाला सोबत घेऊन हे प्रकरण सोडवण्यासाठी शाळा गाठली. मात्र, तिथेही मुलगा कोणत्याही तडजोडीला तयार नव्हता. शिक्षकाची तक्रार घेण्याचा हट्ट करत होता.