Sanjay raut : उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का; संजय राऊतांच्या जवळचा खास माणूसच गेला शिंदे गटात

पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्या असताना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे. पालघर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सुशील चुरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे.

सुशील चुरी यांचे शिंदे गटात जाणे, उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का देणारी गोष्ट आहे कारण, सुशील चुरी हे संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत यांचे निकटवर्तीय होते. दरम्यान, सुशील चुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना आपलं समर्थन असल्याचं जाहीर केलं आहे.

पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर, आता ठाकरे गटात बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते आणि पदाधिकारी जिल्ह्यात राहिले आहेत. तर दुसरीकडे, सुशील चुरी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पश्चिम किनारपट्टीसह डहाणूच्या सर्व भागावर एकनाथ शिंदेंची पकड मजबूत झाल्याचं म्हटलं जात आहे.

माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील ३४२ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. १६ ऑक्टोबर रोजी या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. ३४२ पैकी १० ग्रामपंचायतींचे सरपंच आणि इतर ठिकाणचे ७११ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

त्यामुळे १६ ऑक्टोबर रोजी ३३२ सरपंच आणि २७८० सदस्यांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांसाठी तसेच स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात आहे. मात्र, आता या निवडणुकीच्या ऐन तोंडावर उद्धव ठाकरेंना शिंदे गटाकडून मोठा धक्का बसला आहे.