महाराष्ट्रातील विविध पक्षाच्या नेत्यांनी आणि अधिकार्यांनी सहकारी साखर कारखाने कवडीमोल दरात खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे भागभांडवल देखील राजकीय नेत्यांनी परस्पर खरेदी केल्याची तक्रार जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांना लिहीलेल्या पत्रातून केली आहे. त्याचबरोबर या सर्व प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी अशीही मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
अनधिकृतपणे केलेल्या या व्यवहारात 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आणि खाजगीकरण वाढीस लावलं जात असल्याचा दावा अण्णा हजारेंनी पत्रातून केला आहे. त्यामुळे आता अण्णांच्या या पत्रामुळे राजकीय वादंग होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या मोठ्या आर्थिक घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी हजारेंनी पत्राद्वारे केली आहे. ‘तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अनेक सहकारी साखर कारखान्यांची व्यवहारिकता न तपासता मंजुरी दिली.
राज्याच्या साखर आयुक्तांनी 2015-16 च्या मंत्री समितीला सादर केलेल्या अहवालानुसार, सध्या राज्याचे साखर उत्पादन 7 कोटी मेट्रिक टनांपेक्षा जास्त नसतानाही 9.30 कोटी मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्यांना परवानगी देण्यात आली’ असा आरोप अण्णा हजारे यांनी पत्रातून केला आहे.
सहकारी कारखान्यांची विक्री करताना मालक असलेल्या सभासद शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही. हजारो कोटी रुपयांची पद्धतशीर लूट करण्यात आली. या घोटाळ्याच्या माध्यमातून शेतकरी आणि शेतमजूरांना देशोधडीला लावण्यात आलं. नवीन सहकारी साखर कारखान्यांच्या स्थापनेसाठी इरादा पत्र देण्यास केंद्रीय कृषी मंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच संबंधित विभागाचे सचिव जबाबदार आहेत.
हे नवीन कारखान्यांच्या मंजुरी देण्याच्या पद्धतीवरून स्पष्ट होते. अशा प्रकारे त्यांनी राज्याच्या ऊस उत्पादनाच्या मर्यादेपलीकडे साखर कारखाने उभारण्याची परवानगी देण्यातही मोठी चूक केली आहे” असा आरोपही अण्णा हजारे यांनी केला आहे.