Share

accident : …अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वऱ्हाडाला घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, २० जणांचा दुर्दैवी अंत

लग्नासारख्या शुभ कार्याच्या दिवशीच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर पसरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस दरीत कोसळली आहे. या भीषण दुर्घटनेत तब्बल २० जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

ही दुर्दैवी घटना उत्तराखंडमधील पौडी येथे घडली आहे. पौडी येथे मंगळावरी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेली बस सिमडी गावाजवळ ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या बसमध्ये ५० जण होते.

माहितीनुसार, ही बस दुपारी बाराच्या सुमारास बस लालडंग येथून कांडा मल्लाच्या दिशेने निघाली होती. ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की २० जणांचा यात मृत्यू झाला आहे. तर, उर्वरीत लोकांचा अद्याप शोध सुरु आहे.

अपघाताचे वृत्त समजताच श्रीनगर, कोटद्वार, सातपुली आणि रुद्रपूर येथील एसडीआरएफचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थही बचावकार्यात मदत करत आहेत. तसेच बिरोखल आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहचले आहे.

प्रांताधिकारी सदर प्रेमलाल टम्टा यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. धुमाकोट आणि रिखनिखल पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाल्याची माहिती टम्टा यांनी दिली होती. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी देखील या दुर्घटनेचा आढावा घेतला. तसेच तात्काळ मदत पोहचवण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. दरम्यान, अपघातातील इतर लोकांचा शोध घेणं सुरू आहे. या घटनेने लग्न घरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now