शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना काल ईडीने अटक केली. असे असताना, दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यात शह देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे यांनी ठाण्यातील नवे पदाधिकारी जाहीर केले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवणारे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाण्याचा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, केदार शिंदे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अनिताताई बिर्जे यांना उपनेत्या हे पद देण्यात आलेले आहे.
ठाणे शहरप्रमुखपदी प्रदीप शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, चिंतामणी कारखानीस यांची ठाणे जिल्ह्याच्या विभागीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी ठाण्यात केलेल्या या नवीन नियुक्त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
शिंदे यांना ठाण्यात शह देण्यासाठी ठाकरेंचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ देत एकनाथ शिंदेवर जोरदार टीका केली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे जुने सहकारी असलेले खासदार राजन विचारे हे देखील उद्धव ठाकरे यांच्याच सोबत आहेत.
पक्षात एकनाथ शिंदे यांनी केदार दिघे यांना बाजूला केले होते. तेव्हापासून केदार दिघे एकनाथ शिदेंवर नाराज होते. आता त्यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. राजकीय वर्तुळात सध्या याबाबत चर्चा होत आहेत.