टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी नेमबाज ‘अवनी लेखेरा’ हिला उद्योगपती ‘आनंद महिंद्रा’ यांनी XUV-700 कार भेट दिली आहे. XUV-700 कारला एक विशेष हायड्रॉलिक सीट मिळते ज्यावर अवनी सहजपणे बसू शकते किंवा व्हीलचेअरवर कारमधून बाहेर पडू शकते.
नव्या कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत अवनीने आनंद महिंद्राचे आभार मानले आहेत. महिंद्रा अँड महिंद्राच्या टीमचे तिने कस्टमाईज्ड कार बनवल्याबद्दल आभार मानले. “आनंद महिंद्रा सर आणि ही कार तयार करण्यात गुंतलेल्या महिंद्राच्या संपूर्ण टीमचे आभार! यासारख्या कार अधिक सर्वसमावेशक भारताच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे आणि मी यापैकी अजून अनेक रस्त्यावर पाहण्यास उत्सुक आहे!”
ड्रायव्हिंग सुलभ करण्यासाठी, कारमध्ये विशेष बदल केले गेले आहेत आणि सीट हायड्रॉलिकसह जोडली गेली आहे. त्यामुळे व्हीलचेअरसह कारमध्ये सरळ बसणे सोपे होते. याशिवाय शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्तींना कारमध्ये आरामात बसता यावे यासाठी अनेक बदल करण्यात आले आहेत.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर ही खास कार बनवल्याबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि या कारला पसंत केल्याबद्दल अवनीचे आभार मानले. मूळ जयपूरचा असलेल्या अवनीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले होते. एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती देशातील पहिली खेळाडू ठरली. अवनीला नुकताच ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ हा देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मानही प्रदान करण्यात आला.