पती पत्नीत वाद झाला तर पत्नी रुसून माहेरी जाऊन बसते किंवा नांदण्यास नकार देते, अशा अनेक घटना आपल्या कानावर येतात. बऱ्याच केसेस मध्ये पती पत्नीला आपल्या घरी आणण्यासाठी मनावत असतो. मात्र आता अशी घटना समोर येत आहे, ज्यामध्ये पत्नीने नवऱ्यासोबत जायला नकार दिल्याने पतीने तिच्या घरी चक्क बॉम्ब टाकला आहे.
संबंधित घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली आहे. उत्तर प्रदेश येथील ठाणे एटमादुदौला भागातील रहिवासी असलेल्या हरी सिंहचे लग्न ठाणे डौकीच्या झारपुरा भागातील रहिवासी लखन सिंग यांची मुलगी आशा हिच्याशी झाले होते. हरीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे आशा गेल्या एक वर्षापासून तिच्या माहेरी राहत होती. आशाला घेऊन जाण्यासाठी हरी सतत सासरच्या मंडळींवर दबाव आणत होता, पण आशा तिच्या मर्जीने तिच्या माहेरच्या घरी राहत होती. पत्नी आशा वारंवार माहेरी येऊन राहत होती. घटनेच्या आदल्या रात्री पती हरी तिला आपल्या घरी नेण्यासाठी आला होता. मात्र तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला.
या रागातून संतापलेल्या पतीने त्याच्या सासरच्या घरात देशी बॉम्ब फेकला. बॉम्बच्या जोरदार स्फोटाने घराच्या भिंती हादरल्या. दरवाजे, खिडक्या, घरातील साहित्याचे नुकसान झाले. आवाजाने परिसरातील लोक जागे झाले. सुदैवाने या स्फोटात आशाच्या घरच्यांना कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही.
संबंधित घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी आले. यावेळी, आशाचे वडील लखन सिंग यांनी जावई हरी सिंह विरोधात तक्रार दाखल केली आहे. हरी हा गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच, हरीच्या छळाला कंटाळून मुलगी आशा सासरी गेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पोलिस स्टेशनचे प्रभारी बहादुर सिंह यांनी सांगितले की, हरीने त्याच्या घरी सल्फर आणि स्फोटक पदार्थाने देशी बॉम्ब बनवला होता. त्याने घरात बॉम्ब टाकला आणि बाहेरून पेटवला. बॉम्बचा स्फोट झाल्यामुळे मोठा स्फोट झाला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. लवकरच त्याला अटक करण्यात येईल.