पृथ्वी वरती एलिएन्स लवकरच येणार अशी बातमी आपल्या कानावर कित्येकदा पडते. मध्यंतरी कुणी म्हणालं एलिएन्सचं विमान कोसळलं. या घटनेची प्रचंड चर्चा झाली. आता ही घटना ताजी असतानाच एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्याद्वारे पुन्हा एकदा एलिएन्सबद्दल बोलले जात आहे.
एप्रिल महिन्यात संपूर्ण उत्तर महाराष्ट्राने आणि विदर्भाने आकाशातून कोसळणाऱ्या फायर बॉलचा थरार पाहिला. या घटनेमुळे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर प्रत्येकाने वेगवेगळे तर्क मांडायला सुरुवात केली. अशीच एक तबकडी सध्या कोल्हापूरच्या आकाशात उडत असल्याचं बोललं जात आहे. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
कोल्हापूरच्या आकाशात ही तबकडी पाहून पुन्हा एकदा एलिएन्सची थेअरी मांडली जात आहे. ही चमकणारी पांढरी शुभ्र वस्तू स्थानिक रहिवासी रमेश पाटील, दीपक दळवी, अस्मिता पाटील, मालती पाटील, सीमा माळी आणि विजय यांनी अवकाशात पाहिल्याचा दावा केला आहे.
त्यांनी ही तबकडी पन्हाळा गडावरील अवकाशात बघितली. माहितीनुसार, ही आकाशातील तबकडी तब्बल दोन तास अवकाशात अगदी धिम्या गतीने पुढे सरकत होती. ही तबकडी सदृश्य वस्तू पन्हाळा गडाच्या पश्चिमेकडून उत्तरेकडे पुढे सरकत होती.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ स्थानिक रहिवासी रमेश पाटील यांनी बनवला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी तर्क लावले. अवकाशात दिसणाऱ्या या वस्तूने अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं आहे.
अनेकांनी म्हटलं आहे की जर ते विमान असते तर लगेच समजले असते. पण त्याचा वेग पाहून ते विमान नव्हते हे निश्चित आहे. अवकाशात दिसणारी पांढरी शुभ्र वस्तूची शाहनिशा आता अवकाश संशोधन केंद्राने करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अवकाश संशोधन केंद्राने याचा तपास लावला तर ही अवकाशात उडणारी वस्तू नेमकी काय होती याचा उलगडा होईल. अनेकांना ही वस्तू नेमकी काय आहे हे जाणून घेण्यास उत्सुकता आहे.