अमेरिकेतील टेक्सास येथील शाळेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शाळेत गोळीबार झाला, यात कमीतकमी 21 लोकांचे प्राण गेल्याची माहिती मिळत आहे. या मृतांमध्ये 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
शाळेत झालेल्या गोळीबारात तीन शिक्षकांनीही आपले प्राण गमावले आहेत. तसंच पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 18 वर्षीय हल्लेखोर तरुण ठार झाला आहे. या घटनेबाबत टेक्सासचे गव्हर्नर ग्रेह एबॉट यांनी माहिती दिली. शाळेत घडलेल्या या भीषण घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
माहितीनुसार, ‘रॉब एलिमेंट्री स्कूल’ असं गोळीबार झालेल्या शाळेचं नाव आहे. हा गोळीबार याच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांने केला आहे. त्याचं नाव साल्वाडोर रामोस असे असून, तो 18 वर्षांचा आहे. माहितीनुसार, पोलीस आणि सुरक्षा जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल हा तरुण ठार झाला आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याआधी तरुणाने आपली गाडी शाळेबाहेरच लावली होती. त्यानंतर शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या 18 वर्षांच्या तरुण हल्लेखोराजवळ एक हँडगनही आढळली. तसेच शाळेत हल्ला करण्याआधी त्याने स्वतः च्या आजीला देखील ठार केल्याचे वृत्त आहे.
सध्या त्याच्या आजीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, टेक्सास प्रदेशात घडलेल्या हल्ल्यानंतर जो बायडन यांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हंटले आहे की, आपण कधीपर्यंत देवाच्या नावावर बंदूक घेणार आहोत, हे स्वत:ला विचारणं गरजेचं आहे. जे आई-वडील आता कधीही आपल्या मुलांना पाहू शकणार नाहीत, त्यांचा विचार करणं गरजेचं आहे.
तसेच म्हणाले, आता कडक कारवाई करण्याची वेळ आली असून जे लोक कायदा मोडून हातात बंदूक घेतात, त्यांना आम्ही माफ करणार नाही, असं बायडन यांनी म्हटलं आहे. व्हाईट हाऊस आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अमेरिकेचा ध्वज अर्धवट ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.