मुंबईत काल उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन गटाच्या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कवर तर वांद्रे -कुर्ला संकुलातील बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडला.
या दोन्ही ठिकाणी काल प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंकडून आमदार आणि नेत्यांनी संपूर्ण ताकद लावून मैदान भरण्यासाठी आणि आपल्या गटाची ताकद दाखवण्यासाठी गर्दी गोळा करण्याच्या उद्देशाने मागील काही दिवसांपासून तयारी सुरू केली होती.
त्यातील शिंदे मेळाव्याबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे. शिंदेंच्या मेळाव्याला परराज्यामधून येऊन पुण्यात काम करणाऱ्या कामगारांना घेऊन आल्याचं समोर आलं आहे. टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीने याबद्दलचा खुलासा केला आहे.
बालेवाडी येथून शिंदेंच्या मेळाव्यासाठी आलेल्या ट्रॅव्हल बसेसमधून पुण्यातील मराठी न समजणाऱ्या कामगारांनाही फिरायला जायचं आहे असं सांगून या मेळाव्यासाठी आणण्यात आलं असल्याचं उघड झालं आहे. याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
काल बालेवाडी स्टेडियममधून काही ट्रॅव्हल बसेस बीकेसी मैदानावर रवाना झाल्या, तेव्हा पत्रकारांनी बसमधील काही व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी केवळ प्रवास मोफत असल्याने या मेळाव्याला मराठी न समजणाऱ्या लोकांनाही घेऊन जाण्यात येत असल्याचं समोर आलं.
यापैकी कोणाला मुंबईमध्ये यात्रा आहे असं सांगण्यात आलं होतं, तर कुणाला फिरायला चला असं सांगून बीकेसीच्या मेळाव्याला आणण्यात आलं होतं. हे सर्व कामगार आपण पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि बिहारचे असल्याचं सांगत होते. हे सगळे काल बसमधून मुंबईत गेले होते.






