‘अमोल मिटकरी कमिशन घेतात’ पदाधिकाऱ्यांची जयंत पाटलांकडे तक्रार; राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे राष्ट्रवादीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

जयंत पाटील यांनी मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीत राकाँच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून निधी मिळत नाही, आणि दिला तर मिटकरी त्यावर कमिशन मागतात असा आरोप केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आढावा बैठकीतील या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऐकून घेतल्या असून, त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले आहे.

दगडपारवा जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्या सुमन भास्कर गावंडे यांचा मुलगा व राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल गावंडे यांनीही आमदारांकडून विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्षांकडे आढावा बैठकीत केली. आमदार मिटकरी यांनी १६ कोटीचा निधी एकट्या कुटासा गावात दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावर आता अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, या तक्रारी व आरोप बिनबुडाच्या आहेत. चर्चेतून मार्ग काढता येईल. राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. या कुटुंबात कुणाला काही अडचण असेल तर प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून मार्ग काढू, असे मिटकरी म्हणाले.

अमोल मिटकरी नेहमीच या-ना त्या कारणाने चर्चेत असतात. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधिमंडळ आवारात आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात ते चांगलेच वादग्रस्त ठरले होते. आता तर अकोला जिल्ह्यात त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी कमिशन घेत असल्याचा जाहीर आरोप केला आहे. राजकीय वर्तुळात याबद्दल चर्चा होत आहे.