भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड रिंगणात आहेत. शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी निवडणुकीला उभे आहेत. राष्ट्रवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप रिंगणात आहेत.
भाजपाने या निवडणुकीत पक्षाचे ५ तर अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांना उभे केले होते. मात्र अशातच अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. यावरून आता राजकारण रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची सदाभाऊ खोत यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
याबद्दल ट्विट करत मिटकरी यांनी खोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. ट्विटमध्ये मिटकरी म्हणतात, ‘सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा, म्हणुनच फडणवीसांनी आपणास विश्रांती घ्यायचा सल्ला दिलाय. मात्र, आपण माघार घेतली यावर विश्वासच बसत नाही,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, काल ऐनवेळी सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला, तर राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. येत्या २० जूनला होणाऱ्या विधान परिषद निवडणुका होणार त्यासाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांचे लक्ष या निवडणूकीकडे लागले आहे.