एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. आता या बंडामागे नेमका हात कोणाचा होता याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं किंवा त्यामागे काय कारणं होती, याबद्दल याआधी विधानसभेत केलेल्या भाषणात सविस्तरपणे सांगितलं होतं. परंतु या महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय घडामोडींवर भाजपच्या कुठल्याही नेत्यांनं भाष्य केलेलं नव्हतं. मात्र, आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व करण्यामागचा चाणक्य कोण होता याचा खुलासा केला आहे.
फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील सत्तासंघर्षावर भाष्य केलं आहे. म्हणाले, महाविकास आघाडी सरकार कोसळणं आणि राज्यात सत्ताबदल होणं हे भाजपनं उद्धव ठाकरेंना दिलेलं उत्तर आहे. त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यामुळं आता त्यांना आम्ही उत्तर दिलं, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
तसेच म्हणाले, मी राजकारणातला चाणक्य नाही. परंतु राज्यात जे काही घडलंय त्यात माझी भूमिका होती. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या सगळ्या राजकीय घडामोडीत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मोदींचा राज्यातील सत्ताबदलाच्या रणनितीत सहभाग नव्हता, परंतु त्यांचा आम्हाला आशिर्वाद होता, अशी धक्कादायक माहिती फडणवीस यांनी दिली.
उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले, ‘माझं सरकार पाडून दाखवा’ असं अनेकदा ठाकरेंनी भाजपला आव्हान दिलं होतं. मी त्यांना नेहमी म्हणायचो की, ज्या दिवशी सरकार कोसळेल त्या दिवशी तुम्हाला कळणारही नाही. आता अगदी तसंच झालं. ४०-५० आमदार ठाकरेंच्या नाकाखालून त्यांना सोडून गेले आणि त्यांना कल्पनाही आली नाही.
तसेच म्हणाले, दिवशी उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली होती, त्याच दिवशी त्यांना भाजप एक दिवस प्रत्युत्तर देणार हे निश्चित होतं. परंतु त्यांना कोणत्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाणार हे निश्चित नव्हतं. परिस्थिती बदलली आणि हे सर्व घडलं. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या काही निर्णयामुळंच शिवसेना फुटली असे फडणवीस म्हणाले.