अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डने अनिल अंबानी यांना स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये सामील होण्यास बंदी घातली होती. त्यामुळे, अंबानी यांनी हे पाऊल उचलले आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांना भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डने म्हणजेच ‘सेबी’ने स्टॉक एक्सचेंजमध्ये कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये सहभागी होण्यास मनाई केली होती. त्यामुळे त्यांना रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
मागील महिन्यात ‘सेबी’ कडून, अनिल अंबानी यांच्यासह अन्य तीन उद्योगपतींवर ही कारवाई करण्यात आली होती. अनिल अंबानी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी राहुल सरीन यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे, असे दोन्ही ADAG समूह कंपन्यांनी सांगितले मात्र, या नियुक्तीवर अद्याप सदस्यांच्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणं बाकी आहे.
रिलायन्स कॅपिटल या कंपनीची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली होती. माहितीनुसार, या कंपनीवर 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले होते. डिसेंबर 2020 मध्ये कंपनीचा तब्बल 3966 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यामुळे आता या कंपनीच्या विक्रीची नामुष्की ओढावली आहे, असे सांगण्यात येत आहे.
आता मिळालेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांची कंपनी अदानी फायनान्शिअल सर्व्हिसेस, केकेआर, पिरामल फायनान्स आणि पूनावाला फायनान्ससह 14 मोठ्या कंपन्यांनी ही कंपनी खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. रिलायन्स कॅपिटलवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआयने नियुक्त केलेल्या प्रशासकाकडून कंपनीच्या खरेदीसाठी बोली लावण्याची मुदत वाढवण्यात आली होती.
सेबीने सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यास उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासह रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडसह अन्य तीन व्यक्तींवर निर्बंध घातले होते. सेबीने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले होते की, या कंपन्यांना आणि संबंधित व्यक्तींना, ज्यांचा भांडवल जमा करण्याचा स्पष्ट हेतू दिसतो, अशांना सेबीकडे नोंदणीकृत असलेली कोणतीही मध्यस्थ, सार्वजनिक कंपनीच्या संचालक आणि प्रवर्तकांशी व्यवहार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.