देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी आज भारतीय इमाम संघटनेचे अध्यक्ष अहमद इलिसासी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. यावेळी या भेटीत राजकीय विषयांसह हिंदू-मुस्लिम सलोखा राखण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांची काही मुस्लिम समाजातील विचावंतांसोबत दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत तासभर चर्चा झाली. त्यावेळी त्यांच्यात देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीवर चर्चा झाली.
सरसंघचालक भागवत यांची भेट घेतल्यानंतर इलिसासी म्हणाले की, आम्ही सर्व लोक राष्ट्र सर्वोतोपरी मानतो, आमचा डीएनए एक असला तरी आमची श्रद्धा आणि उपासना करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. इलियासी यांचे भाऊ सुहैब इलियासी म्हणाले की, आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही मोहन भागवतांना आमंत्रण दिलं होतं. ते आम्हाला भेटण्यासाठी आल्यानं यातून चांगला संदेश गेला आहे.
मोहन भागवत यांनी हिंदुंना उद्देशून बोलल्या जाणाऱ्या काफिर या शब्दावर आक्षेप घेतला, त्यावेळी मुस्लिम विचारवंतांनी हा शब्द वापरणार नसून इतरांनाही न वापरण्यास सांगू असं सांगितलं. त्यानंतर उजव्या विचारधारेच्या संघटना सातत्यानं मुस्लिमांच्या राष्ट्रप्रेमाविषयी शंका घेण्यावरून आणि जिहादी आणि पाकिस्तानी शब्दांवरून भागवतांसमोर आक्षेप घेतला. त्यानंतर भागवतांनी अशा संघटनांच्या लोकांना समज देण्याचं वक्तव्य केल्याचं समजतं.
दरम्यान, देशातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गेल्या काही महिन्यांपासून विविध मुस्लिम विचारवंतांची भेट घेतली जात आहे. काही दिवसांपूर्वीच भागवत यांनी दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग, माजी निवडणूक आयुक्त एसवाय कुरैशी, माजी खासदार शाहिद सिद्दीकी, उद्योजक सईद शेरवानी आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू जमीरुद्दीन शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भारतीय इमाम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भागवत यांनी भेट घेतली आहे.
गेल्या काही वर्षांपासून देशात गायीच्या नावाखाली झालेली मॉब लिंचिंगची प्रकरणं, हिजाबचा मुद्दा, भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि रामनवमीला देशातील अनेक ठिकाणी झालेला धार्मिक हिंसाचारानंतर आता देशात सामाजिक सलोखा राखण्यासाठी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लिम विद्वानांकडून प्रयत्न केले जात असल्यानं याची फार चर्चा होत आहे.