अभिनेता अल्लू अर्जून हा आता केवळ साऊथ स्टार राहिलेला नसून पॅन इंडिया स्टार बनला आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाने अल्लू अर्जूनला खूप लोकप्रियता मिळवून दिली आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप त्याची क्रेझ कमी झाली नाही. सर्वत्र केवळ ‘पुष्पा’चीच चर्चा आहे. यादरम्यान एका मुलाखतीत बोलताना अल्लू अर्जूनने चित्रपटाच्या कथानकाच्या निवडीवर भाष्य केलं (allu arjun about movie selection) आहे.
अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अल्लू अर्जूनला विचारण्यात आले की, चाहते आणि कलाकार यांच्यातील नात्याला तुम्ही कसे परिभाषित कराल. यावर उत्तर देताना अल्लू अर्जूनने सांगितले की, ‘मी माझ्या चाहत्यांप्रती उत्तरदायी आहे. जर त्यांना काही झाले तर मला त्यांची काळजी घ्यावी लागते. काहीवेळा पैशांद्वारे तर काहीवेळी दुसऱ्या पद्धतीने मदत करावे लागते. हे एकप्रकारचे देवाण-घेवाण आहे. चाहत्यांनी आम्हाला इतकं काही दिलं आहे. त्याबदल्यात आम्ही थोडंसं जरी करू शकलो तर आमचं ते सौभाग्य समजतो’.
पुढे त्याने म्हटले की, ‘एवढेच नाही तर जेव्हा मी कमर्शियल चित्रपट बनवतो तेव्हा हे लक्षात ठेवतो की, ते पाहतेवेळी मुलांना संकोच वाटू नये. चित्रपटगृहात बसलेल्या महिलांना संकोच वाटू नये. मी असे चित्रपट कधीच करणार नाही जे मी माझ्या पत्नी आणि मुलीसोबत पाहू शकत नाही. जर माझ्या कुटुंबीयांसोबत बसून मी माझाच चित्रपट पाहू शकत नसेन, तर मी अशा चित्रपटात कधीच काम करणार नाही’.
यावेळी ‘पुष्पा’ चित्रपट हिट होण्याबाबत बोलताना अल्लू अर्जूनने सांगितले की, ‘माझे सुरुवातीपासून एकच ध्येय राहिले आहे आणि ते म्हणजे जास्तीत जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करणे. माझ्या प्रेक्षकांच्या संख्येत ज्याप्रमाणे वाढ होत जाईल त्याप्रमाणे माझ्या आनंदात भर पडत जाईल. तसेच एका कलाकाराच्या रूपात प्रत्येकजण हेच इच्छितात की, त्या कलाकाराने विशाल आणि विस्तृत क्षेत्राच्या प्रेक्षकांचे मनोरंजन करावे. मी या गोष्टीने खुश आहे की, मी सुरुवातीपेक्षा अधिक जास्त लोकांपर्यंत पोहोचलो आहे’.
दरम्यान, अल्लू अर्जून सध्या ‘पुष्पा पार्ट २’ या चित्रपटावरच लक्ष केंद्रित करत असून त्यानंतरच पुढच्या प्रोजेक्टबाबत विचार करणार असल्याचे सांगितले. तसेच जर कोणी त्याच्याकडे हिंदी चित्रपटाची ऑफर घेऊन आल्यास आणि जर कथानक चांगले असेल तर त्याबाबत तो नक्कीच विचार करणार आणि चित्रपटात काम करण्यासही तयार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.
दरम्यान, ‘पुष्पा’ हा चित्रपट१७ डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. तेलुगूसोबत हा चित्रपट तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ओटीटीवरही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ओटीटीवरही हा चित्रपट खूपच गाजला. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता प्रेक्षक ‘पुष्पा २’ साठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
नागिन 6: तेजस्वी प्रकाशच्या नागिन लूकने केला कहर; किलर परफॉर्मन्स पाहून चाहते झाले घायाळ
जेव्हा लीक झाली होती सलमान खानची ऑडिओ टेप, प्रिती झिंटासोबतच्या नात्याची झाली होती चर्चा
आर्ची अन् परशा सैराट! स्वत: रिंकूनेच ‘ते’ खाजगी फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का