Share

संजय राऊतांनी संशय घेतलेले ‘ते’ तीनही आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर; राजकारणात खळबळ

विधान परिषद निवडणूक उद्या म्हणजेच २० जूनला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काॅंग्रेसने काल ट्रायडेंटमध्ये आपल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला संजय राऊत यांनी संशय घेतलेले आमदार देखील उपस्थित होते, त्यामुळे सध्या या बैठकीची चर्चा होत आहे.

काल राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आदी वरिष्ठ नेते या उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्वच आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकी दरम्यान ज्या आमदारांवर संशय व्यक्त केला ते बैठकीला हजर होते.

बैठकीला आमदार संजय शिंदे, देवेंद्र भुयार, आणि श्यामसुंदर शिंदे हे आमदार उपस्थित होते. हे तेच आमदार आहेत, ज्यांच्यावर संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळी संशय व्यक्त केला होता. त्यानंतर राऊतांच्या आरोपांवर या तिघांनीही नाराजी व्यक्त केली होती.

या तिघांनीही तेव्हा आपण महाविकास आघाडीलाच मतदान केल्याचा दावा केला होता. तसेच, विधान परिषद निवडणुकीत आम्हाला वेगळी भूमिका घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा देखील संजय राऊत यांना दिला होता. त्यामुळे या तीन आमदारांची बैठकीला उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला.

दुसरीकडे कालच्या बैठकीनंतर तरी हे आमदार राष्ट्रवादी सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार सहजपणे निवडून येण्याचा मार्ग खुला झाला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोघांना उच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारल्याने राष्ट्रवादीची मतदारसंख्या ही ५१ वर आली होती.

आता हे तीन अपक्ष आमदार पक्षासोबत असल्याचे स्पष्ट झाल्याने ही संख्या पुन्हा ५४ झाली आहे. त्यामुळे २७ चा कोटा आला तर राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे सहज निवडून येतील, असे बोलले जात आहे. आपण एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे शरद पवारांनी यावेळी आमदारांना सांगितलं.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now