कोरोना महामारीच्या काळात गरीब, श्रीमंत लोकांसोबतच अनेक मोठ मोठ्या मंत्र्यांना कोरोनापुढे हात टेकवावे लागले. अनेकांचे कोरोना संसर्गाने जीव घेतले, तर अनेकांनी उपचारासाठी लाखो पैसा ओतला. याचवेळी सरकारमधील मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन कोट्यवधींची बीलं सरकारी तिजोरीतून भरली. आता या पार्श्वभूमीवर जनसामान्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी उत्तर दिले की, ‘तुम्ही काहीही झालं की यावर तुमचं मत काय म्हणून मला प्रश्न विचारता. मला मंत्र्यांच्या बिल प्रकरणाबाबत एवढंच सांगायचंय, मी कोरोनावर उपचार घेत असताना माझा स्वत:चा पैसा खर्च केला आहे.’
तसेच म्हणाले, ज्यांनी खासगी बिलं सरकारीत लावली, त्यांना तुम्ही जाऊन प्रश्न विचारा, स्वत:चा पैसा खर्च करण्याऐवजी सरकारचा पैसा का घेतला, बाबांनो तुम्ही असं का का केलं? अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार चिडले असल्याचं यावेळी दिसलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोना काळातील दोन वर्षात ठाकरे सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. या उपचारासाठी लागलेला लाखोंचा खर्च सरकारी तिजोरीतून भरला. या 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयातील उपचारासाठी तब्बल 1 कोटी 39 लाख खर्च केले.
विशेष म्हणजे, या सगळ्यांचं बील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नावावर आहे. टोपेंनी सरकारी तिजोरीतून तब्बल 34 लाख रुपये भरल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती उघड झाल्यानंतर आता महाविकास आघाडीवर विरोधी पक्ष कोणती प्रतिक्रिया देईल हे पाहणं आवश्यक राहील.
दोन वर्षात या मंत्र्यांनी उपचार घेतल्याची बिलं राज्य सरकारला सादर केली आहे. या सर्व मंत्र्यांच्या उपचारापोटी शासनाने 1 कोटी 39 लाख 26 हजार 720 रुपये भरले आहेत. सरकारी नियमानुसारच हे बील भरण्यात आलं आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मात्र, ज्यावेळी जनता सरकारी रुग्णालयात उपचार घेत होती, तेव्हा मंत्री मात्र फाइव्ह स्टार हॉटेलात उपचार घेत होते. त्यामुळे मंत्र्यांचा सरकारी रुग्णालयांवर विश्वास नाहीये का? असा सवाल या निमित्ताने केला गेला. सूत्रांच्या माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली होती.