Share

शिवरायांबाबत वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांना अजित पवारांनी झाप झाप झापले, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यात त्यांनी पुणे महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण केलं आहे. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोसेवेलाही हिरवा झेंडा दाखवत उद्घाटन केलं आहे.

परंतु आता पुण्यातील MIT कॉलेजमध्ये पार पडलेल्या सभेत अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याची फार चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचं उद्घाटन केल्यानंतर त्यांची कोथरूडमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी व्यासपीठावरुन बोलताना थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यांनी कोश्यारींची मोदींकडे तक्रार करताना व्यासपीठावरुन म्हटलं की ‘मला पंतप्रधानांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायची आहे, अलीकडे महत्त्वाच्या पदावरच्या सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक विधानं होत आहेत ती वक्तव्यं महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला न पटणारी आहेत’. असं म्हणत अजित पवारांनी राज्यपालांच्या याआधीच्या वक्तव्यांचा पंतप्रधानांच्या समोर समाचार घेतला आहे.

त्यामुळे आता राज्यपाल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील वाद शिगेला पोहचल्याचं दिसत आहे. त्यातच आता अजित पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची तक्रार केल्यामुळे हा वाद आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा?’, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमातही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला होता.

त्यांच्या या वक्तव्यांचा निषेध म्हणून महाविकास आघाडीतर्फे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले होते. परंतु आता उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची तक्रार केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now