‘मुख्यमंत्री साहेब..! इथे थोडा भेदभाव होतो म्हणून…’, अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतभेद सुरू असल्याची चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले उपरोधिक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ‘मुख्यमंत्री साहेब… इथे थोडा भेदभाव होतो म्हणून बातम्या येतात,’ असे अजितदादा यांनी म्हंटले आहे.

जीएसटी भवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांनी हे उपरोधिक वक्तव्य केले आहे. यावेळी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थित होते. मात्र यावेळी अजित पवार यांनी केलेले विधान हे गंभीर नव्हते तर गमतीशीर होते.

मात्र तरी देखील अजितदादांच्या या विधानावर सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. ‘मुख्यमंत्री आमच्या खात्याच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे मतभेद असल्याच्या बातम्या येत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. याचबरोबर अलीकडे सेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मतभेद सुरू असल्याची चर्चा सुरू असताना अजितदादांनी केलेले हे विधान चर्चेचा विषय बनला आहे.

तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो. तुम्ही मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमाला येतात. मात्र आमच्या विभागाच्या कार्यक्रमाला येत नाहीत. त्यामुळे मतभेदाच्या बातम्या मिडियात येतात. त्यामुळे तुम्हीच काय ते खरं सांगा, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेकदा पत्रकार सरकारमधील नाराजीनाट्याबाबत अजितदादांना विचारत असतात. आता याच प्रश्नावर अजितदादांनी रोखठोक मत व्यक्त केले आहे.

तर दुसरीकडे ठाकरे सरकारच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसचे आमदार मंत्र्यांवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेसमधले 25 आमदारांची नाराजी महाविकास आघाडीसाठी अचडणीची ठरण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या 25 आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं आहे.