मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
एकट्या फडणवीसांकडे तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. अशातच पवारांनी फडणवीसांवर केलेल्या वक्तव्याला भाजपचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. म्हणाले, अजित पवार हे विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे त्यांना असं बोलावं लागतं, हे जरी खरं असलं तरी अजित पवार हे वस्तुस्थिती जाणणारे नेते आहेत, असं मी मानतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
तसेच म्हणाले, फडणवीसांकडे सहा जिल्हे दोन वर्षे राहणार नाहीत. ही वेळेनुसार केलेली तडजोड आहे. असं तुम्ही तुमच्या कार्यकाळातही केलं होतं. तुम्ही सहा मंत्र्यांच्या मदतीने तीन महिने सरकार चालवलं होतं. त्यावेळी प्रत्येकाकडे आठ-आठ खाती होती, असे म्हणत अजित पवारांना टोला लगावला.
पाटील म्हणाले, एवढ्या मोठ्या राज्यात जेव्हा दोन पक्ष एकत्र काम करत असतात, तेव्हा खात्यांची किंवा जिल्ह्यांची सहमती व्हायला वेळ लागतो. आता राजकारण हा अर्धवेळ काम करण्याचा विषय राहिला नसून, राजकारणासाठी पूर्णवेळ द्यावा लागतो.
‘मी स्वत: १५-१५ दिवस घरी जात नाही. मोठेपणा म्हणून हे मी सांगत नाही, पण हेच सगळ्यांनी केलं पाहिजे’, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अजित पवार यांनी फडणवीसांवर टोला लगावला होता की, ‘माझ्याकडे पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद होतं तर माझ्या नाकी नऊ येत होतं, ते सहा जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार आहेत?’ असा खोचक सवाल पवार यांनी फडणवीस यांना विचारला होता.