शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे माजी आमदार विनायक मेटे यांच्या गाडीचा काल सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
मेटे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शोक व्यक्त केला. म्हणाले, विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे.
तसेच म्हणाले, मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाज आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होतं. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सोबत असलेले ते माझे सहकारी होते, असे पवार म्हणाले.
एवढेच नाही तर अजित पवार यांनी त्यांच्या अपघाताबद्दल शंका देखील व्यक्त केली आहे. म्हणाले, बीडहून मुंबईकडे निघालेल्या विनायक मेटेंचा रात्रभर प्रवास सुरू होता. त्यांना सकाळी बैठकीसाठी मुंबईमध्ये दाखल व्हायचे होते. माझ्या अंदाजानुसार रात्रभर चालकाने गाडी चालवल्याने कदाचित त्याला डुलकी लागली असावी आणि त्यामध्येच हा अपघात झाला असावा.
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातामुळे विनायक मेटे यांची प्रकृती गंभीर होती. तसेच, विनायक मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचं निधन झालं.
मेटे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेटे यांचं संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होतं. गरिबीतून वर येऊन स्वत:च्या भरोशावर उभा राहिलेलं नेतृत्व होतं. मराठा आरक्षणाचा लढा त्यांनी लढला. यासंदर्भात त्यांचा प्रचंड अभ्यास होता. माझ्यासाठी ते जवळचे सहकारी होते असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.