सध्या सगळीकडे लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. लग्न म्हटलं की धमाल, मजामस्ती आलीच.अक्षत्याने नवीन जोडप्याच्या संसाराला सुरुवात होते. जे अक्षता आशीर्वादरुपी डोक्यावर पडतो तेच अक्षता लग्न मोडण्याचे कारण बनले आहे. लग्न सुरु असताना अचानक लग्नातील मंडळींनी हाणामारीला सुरुवात केली अन क्षणातच होत्याच नव्हतं झालं.
साताऱ्यातील बोरगाव येथे ही घटना घडली आहे. बोरगाव येथील एका मंगल कार्यालयात थाटामाटात लग्न सुरु होते. सगळ्या विधी ठरलेल्या मुहूर्ताप्रमाणे सुरळीत पार पडत होत्या. लग्नाचा मुहूर्त जवळ आल्याने वधु – वराच्या मामांनी त्यांना मंडपात आणले. आंतरपाट धरून मंगलाष्टकांना सुरुवात झाली. त्यावेळी नवरा-नवरीच्या शेजारी करवला आणि करवल्यांची गर्दी होती.
पहिल्या मंगलाष्टकेनंतर दुसरीही मंगलाष्टक झाली. पण तिसरी मंगलाष्टक होतेय तोच करवला आणि करवाल्यांनी एकमेकांच्या अंगावर जोरजोरात अक्षता फेकायला सुरुवात केली. यावेळी नवरीच्या मामांनी त्यांना अक्षता टाकण्यापासून अडवले. त्यातून शाब्दिक वाद वाढत जाऊन मामांनाच कानाखाली मारली. हा वाद टोकाला गेल्याने या दोन्हीकडच्या लोकांनी एकमेकांवर हात उचलला.
बाचाबाची, गोंधळ, हाणामारी यामुळे लग्नसोहळा थांबवावा लागला. ठरलेले लग्न मंडपातच मोडले. हाणामारीमुळे या मंडळींना सर्व प्रथम दवाखान्यात उपचार घ्यावे लागले. त्यानंतर त्यांनी वर आणि वधू सह पोलीस स्टेशन गाठत एकमेकांविरुद्ध तक्रार दिली.
वराच्या घरच्यांनी शिवीगाळ आणि अपशब्द वापरल्याचा आरोप केला, तर वधूच्या घरच्यांनी मारहाणीचा आरोप केला. पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी केली पण दोन्हीकडची मंडळी माघार घेण्यास तयार नव्हती. शेवटी क्षुल्लक कारणावरून दोघांचा संसार सुरु होण्यापूर्वी मोडला.
लग्नात आनंदाचा भाग म्हणून वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यातून वादही होतातच. ज्येष्ठ मंडळी एकत्र येत यावर तोडगा काढतात पण साताऱ्यात याउलट घडले आहे. टवाळखोरांच्या एका क्षुल्लक चुकीवरून लग्न मोडले.






