Share

पतीच्या निधनानंतर कारल्याने केले महिलेचे आयुष्य गोड, वाचा ‘कारलेवाली बाई’ची यशोगाथा

पतीच्या निधनानंतर खचून न जाता एका महिलेने मोठ्या हिमतीने शेतीत काम करून जिल्ह्यात नाव मिळवलं आहे. आता महिला शेतकरी म्हणून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या महिलेने कारल्याची शेती करून आपली प्रगती सुधारली आहे. जिल्ह्यात प्रगतिशील शेतकरी म्हणून सध्या तीला ओळखले जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वेंडाली या गावातील महिला शेतकरी नंदाताई पिंपळशेंडे यांची ही कहाणी आहे. पतीचे निधन 25 वर्षांपूर्वी झाले. पती दोन मुलं पदरात टाकून आयुष्यातून निघून गेला. मुलांच्या उज्वल भविष्यासाठी तिनं मोठ्या हिमतीने संकटांचा सामना करत शेतातून आर्थिक विकास साधण्याचा निश्चय केला.

तिच्याकडे शेतीसाठी जेमतेम चार एकर जमीन आहे. पहिल्यांदा भावाच्या मदतीने त्यांनी शेती करायला सुरुवात केली. कपाशीचे आणि सोयाबीनचे पिके त्या घेऊ लागल्या. मात्र, कोरडवाहू शेती असल्याने पिकाचे उत्पन्न अल्प व्हायचे. त्यामुळे नंदाताईंनी सिंचनाच्या सूविधेसाठी शेतात बोरवेल मारली.

पाणी भरपूर लागल्याने त्यांनी सिंचन पध्दतीचा अवलंब केला आणि त्या ओलीताच्या शेतीकडे वळल्या. संपूर्ण शेतीला कोटेरी तारांचे कुंपण केले. बोअरवेलच्या पाण्याने शेतात कारल्याचे पिक बहरले. कृषी विभागाच्या अनुदानावर शेतात ठिबक सिंचन संच बसविला.

त्या शेतात त्यांनी बारमाही पालेभाज्या घेण्याचे ठरवले. विशेष म्हणजे त्यांनी कारले उत्पादनावर अधिक भर दिला. कारल्याचे मोठे उत्पादन त्यांनी घेतले. पुढे त्यांना ‘कारलेवाली बाई’ म्हणून ओळख मिळाली. तंत्रज्ञानाचा, पिकाचा योग्य अभ्यास करून त्यांनी उत्तम दर्जाची कारली शेतात पिकवली.

कारली पिकांच्या उत्पादनातून त्यांना मोठा नफा मिळाला. त्यांच्या शेतातील कारल्याची मागणी वाढली. सध्या प्रगतशील शेतकरी म्हणून त्या लोकप्रिय आहेतच मात्र त्यांना ओळख दिली ती कारल्याच्या पिकानीच. सध्या त्यांच्या शेतात भाजीपाला देखील आहे. आज अनेक शेतकऱ्यांसाठी विशेषतः महिला शेतकऱ्यांसाठी त्या आदर्श म्हणून पुढे आल्या आहेत.

इतर

Join WhatsApp

Join Now