‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर याने काश्मिरी पंडितांना बेघर करून हत्या करणारा बिट्टा कराटे ची भूमिका केली आहे. दरम्यान, शूटिंग दरम्यान या पात्रासाठी लोकांनी त्याला अडवल्याचा एक किस्सा चिन्मय मांडलेकरने सांगितला आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत तब्बल 60 कोटींचा गल्ला जमवला. यावरून हा चित्रपट पाहण्याची लोकांमधील उत्सुकता दिसून येत आहे. अनेक राज्यात हा चित्रपट करमुक्त केला आहे. चित्रपटातील सगळ्यांच्याच भूमिका पाहून लोक थक्क झाले आहेत. या चित्रपटात बिट्टा कराटे ची भूमिका करणारा चिन्मय मांडलेकर याच्या अभिनयाचे देखील कौतुक केले जात आहे.
चिन्मय मांडलेकरने चित्रपटात दहशतवादी बिट्टा कराटे ही भूमिका साकारली आहे. काश्मिरी पंडितांना बेघर करणारा आणि अमानुषपणे त्यांची हत्या करणारा हा बिट्टा कराटे चिन्मयने पडद्यावर हुबेहूब साकारला आहे. चिन्मय मांडलेकरने या पात्राचे शूटिंग चालू असतानाचा एक किस्सा सांगितला आहे, जो अतिशय संवेदनशील आहे.
तो म्हणाला की, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचं शूटिंग मसुरीमध्ये सुरु होतं. त्यावेळी मॉब सीनसाठी काही स्थानिक लोकांना बोलावलं होतं. यावेळी तिथे सेटवरच्या भारतविरोधी घोषणा लोकांनी ऐकल्या. यावेळी बिट्टा कराटेची भूमिका चालू होती. मॉबच्या कानावर या घोषणा जाताच त्यांनी आम्ही यात काम करणार नाही आणि काम सुरु राहू देणार नाही, यात देशाविरोधात बोललं जात आहे, असं म्हणत शूटिंगमध्ये अडथळा आणला.
हे शूटिंग मसुरीत चालू होते. तेथील लोकांचा रोष पाहून त्यांना चित्रपटातील या पात्राबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली. त्यानंतर चिन्मय मांडलेकरने लोकांना त्याच्या मराठीतील भूमिका दाखवल्या. आपण मराठीत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारात असल्याचे देखील सांगितले.
त्यानंतर हा मॉब थोडासा निवळला. मात्र, लोकांनी एक अट घातली. ती अट म्हणजे, प्रत्येक सीननंतर सेटवरील सर्वांनी ‘भारत माता की जय’ या घोषणा द्याव्यात. ही अट सेटच्या सर्व लोकांनी मान्य केली. त्यानंतर प्रत्येक सीननंतर थांबून चिन्मय स्वतः देखील ‘भारत माता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार’, ‘जो बोले सो निहाल’ अशा सगळ्या घोषणा देत होता.