शिवाजी महाराजांविषयी सखोल अभ्यास करून त्यावर अमित शाह यांनी पुस्तक लिहिले- देवेंद्र फडणवीस

‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम मुंबईत पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्याबाबत एक महत्वाच्या गोष्टीचा खुलासा केला आहे. अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा सखोल अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिल्याचे सांगितले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला आहे. ते तासंतास यावर बोलू शकतात. त्यावर त्यांनी एक पुस्तक देखील लिहिले आहे. देश-विदेशातून त्यासाठी त्यांनी त्या संदर्भात संदर्भ देखील गोळा केल्याचं त्यांनी सांगितले.

मात्र अमित शाह यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन अजून व्हायचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ हे पुस्तक त्यांच्या वाटचालीचा महत्त्वाचा आलेख आहे. भारतीय जनता पार्टीत एक सामान्य कार्यकर्ता कसा मोठा होतो हे यानिमित्ताने समजते.

अमित शाह यांचं व्यक्तिमत्त्व केवळ निवडणुकीतील जय-पराजयानं समजून घेता येत नाही. त्यांनी भाजपाची नव्याने केलेली शिस्तबद्ध बांधणी, पक्षात तळापर्यंत रुजविलेले संघाचे संस्कार, पक्षविस्तारासाठी केलेली देशभरची भ्रमंती, कार्यकर्त्यांशी सतत संवाद यांसारखे अनेक कंगोरे या पुस्तकातून लोकांसमोर आले आहेत.

यावेळी, त्यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. म्हणाले, केवळ भाषण नाही, तर कृतीत आणून दाखवणारे फार कमी नेते असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे त्यातील नेते आहेत. जे बोलतात ते कृतीत आणून दाखवतात. मात्र, आजकाल ‘गदाधारी’ हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, पण रोज सकाळी टीव्ही पाहिला की ते ‘गधाधारी दिसते, असे म्हणाले.

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला मोठा भाऊ कोण हे अमित शहा यांच्यामुळेच समजले. आव्हानांचे संधीत रूपांतर करण्याचे अनोखे कसब शाह यांच्याकडे असून समाजातील शेवटचा घटक या पक्षाचा केंद्रबिंदू असला पाहिजे यावर त्यांचा नेहमीच भर आहे. नव्या पिढीला शहा यांचा प्रेरणादायी प्रवास मार्गदर्शक ठरेल असे गौरवोद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.