Share

२४ वर्षांनंतर घरात मुलगी जन्माला आली; आमदाराने तिला हेलिकॉप्टरने घरी आणत केले जंगी स्वागत

तब्बल २४ वर्षांनी घरात मुलगी जन्माला आली या आनंदात आमदाराने चक्क तिला हेलिकॉप्टरमधून आणले. तिचे स्वागत देखील अगदी थाटामाटात केले. तिच्या अनोख्या स्वागतासाठी अनेकांनी उपस्थिती लावली. मुलीचे स्वागत करणारा हा आमदार दुसरा तिसरा कोणी नसून, खेडचे आमदार दिलीप मोहिते आहेत.

आमदार दिलीप मोहिते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यांचे पुतणे मयूर मोहिते यांना महिनाभरापूर्वी कन्यारत्न झाले.  त्यांच्या घरात तब्बल २४ वर्षांनी मुलगी झाल्याने आपल्या नातीचे त्यांनी जंगी स्वागत केले. तिचे नामकरण देखील करण्यात आले असून, तिचे नाव राजनंदिनी असे ठेवण्यात आले आहे.

मोहिते यांच्या घराण्यात मुली कमी आहेत. त्यात राजनंदिनीच्या रुपाने तब्बल २४ वर्षांनंतर घरात मुलीचा जन्म झाला. त्यामुळे आमदार मोहिते आणि त्यांच्या पत्नी सुरेखा मोहिते यांना अतिशय आनंद झाला. कुटुंबीयांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. त्यामुळे त्यांनी तिचे अनोखे स्वागत केले.

राजनंदिनीला आजोळहून खास हेलिकॉप्टरने राजगुरूनगरला आणले गेले. गुरुवारी क्रीडासंकुलाच्या मैदानावर तिचे आगमन झाले.  तिच्या अनोख्या स्वागतासाठी येथील आमदारवाडा सज्ज झाला. सर्व कुटुंबीयांनी तिला हातात घेऊन तिचे मुखदर्शन घेतले. नंतर आमदारवाड्यावर आल्यावर फुलांच्या पाकळ्या मायलेकींवर उधळण्यात आल्या.

तिच्या स्वागतासाठी आमदार मोहिते कुटुंबीयांकडून फुग्यांच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. फुलांच्या पायघड्यांवरून तिला वाड्यात नेण्यात आले. ओल्या कुंकवात, तिचे पाय बुडवून त्या पायांचे ठसे शुभ्र कापडावर घेऊन, तिचा गृहप्रवेश करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने विधी झाल्यानंतर केकही कापण्यात आला.

राजगुरूनगरहून नंतर तिला शेलपिंपळगावला पाठविण्यात आले. तिथेही बग्गीतून तिची मिरवणूक काढण्यात आली. एवढ्या जंगी स्वागताबद्दल आमदार मोहिते यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, आमच्या चौघा भावांच्या मोठ्या घरात खूप वर्षांनी मुलीचा जन्म झाल्याने आम्हाला खूप आनंद झाला. म्हणून लक्ष्मीच्या पावलांनी जन्मलेल्या नातीचे आम्ही अशा पद्धतीने स्वागत केले आहे.

राजकारण इतर राज्य

Join WhatsApp

Join Now