राज्यात सध्या शिंदे गट आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशी स्थिती असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
रोहित पवार जुन्नर येथे बोलत होते. म्हणाले, २०२४ नंतर राजकारणातील समीकरणं बदलणार आहेत, नव्या पिढीला निर्णय घ्यावे लागणार आहेत. इतकंच नाही तर शरद पवार आणि अजित पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला असेलच असे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
रोहित पवार म्हणाले, २०२४ नंतरची वेळ युवकांची आहे. ती वेळ आमची आहे. २०२४ ला आपल्याला सर्वांसोबत राहून आपल्या विचारांचं सरकार कसं येईल? यासाठी काम करावं लागणार आहे. जेव्हा आपली वेळ येते, तेव्हा निर्णय देखील आपल्यालाच घ्यावे लागतील.
तसेच म्हणाले की, २०२४ मध्ये अनेक निर्णयांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला असेलच. पण कोणतं काम करायचं, कसं करायचं ? कुणाकडे कोणतं पद द्यायचं? याचा निर्णय नवीन पिढी घेईल असे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं.
त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. मात्र, आता रोहित पवार यांनी यावर ट्विटद्वारे स्पष्टीकरण दिलं म्हणाले, मी म्हणालो त्याचा वेगळा अर्थ घेण्यात आला आहे. मी म्हणालो, अनियंत्रित सत्ता, केंद्रीय यंत्रणा, दडपशाही यांसारख्या विविध मार्गांनी लोकशाहीवर परिणामी संविधानावर आघात होत आहे.
अशा परीस्थितीत लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्याची सर्वाधिक जबाबदारी युवांवर आहे. युवावर्गाच्या सक्रीय सहभागाशिवाय लोकशाहीविरोधी शक्तींचा पराभव शक्य नाही. शरद पवार आणि रोहित पवार यांच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याचाही अर्थ वेगळा घेतला आहे.
आदरणीय पवार साहेब आणि अजितदादांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते युवांना राजकारणात येण्याबाबत मार्गदर्शन करत असतात. त्यादृष्टीनेच मी काल युवांना सक्रीय राजकारणात येण्याचं आवाहन करताना येणारा काळ हा युवांचा असेल असे म्हणालो होतो असे रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलं.