भारत देशाला यंदाची मिस इंडिया मिळाली आहे. ३ जुलै रोजी मुंबईत मिस इंडिया २०२२ ची अंतिम फेरी पार पडली. त्यात कर्नाटकच्या सिनी शेट्टीने मिस इंडिया २०२२चा मुकुट आपल्या नावे केला आहे. तिने अंतिम फेरीत ३१ फायनलिस्टवर मात करत हा मुकुट मिळवला आहे.
सिनी शेट्टी ही केवळ २१ वर्षांची आहे. मिस इंडिया २०२२ चा ग्रँड फिनाले ३ जुलै रोजी मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला. विजेत्या सिनी शेट्टीनंतर राजस्थानच्या रुबल शेखावतने दुसरे स्थान पटकावले. ती मिस इंडिया २०२२ ची फर्स्ट रनर अप होती. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारी शिनाता चौहान ही दुसरी उपविजेती ठरली.
मिस इंडिया २०२१ची विजेती मनसा वाराणसी हिने मिस इंडिया २०२२ चा ताज सिनी शेट्टीवर चढवला. सिनी शेट्टी, रुबल शेखावत, शिनाता चौहान, प्रज्ञा अय्यागरी आणि गार्गी नंदी टॉप ५ मध्ये होत्या. विजेतेपदी निवड झाल्यानंतर सिनीच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. या विजयाबद्दल इतर स्पर्धकांनीही त्याचे अभिनंदन केले.
सिनी शेट्टी बद्दल अधिक माहिती म्हणजे, तिचा जन्म मुंबईत झाला पण ती मूळची कर्नाटकची आहे. ती सध्या चार्टर्ड फायनान्शियल अँनालिस्टचा कोर्स करत आहे. नृत्य हे तिचं पहिलं प्रेम आहे. मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर आता ती ७१व्या मिस वर्ल्ड या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
राजस्थानची रुबल शेखावत बद्दल सांगायचे झाल्यास, तिला फेमिना मिस इंडिया २०२२ चा फर्स्ट रनर अपचा मुकुट देण्यात आला. ती स्वतःला एक जिज्ञासू विद्यार्थी समजते. रुबलला नृत्य, अभिनय, चित्रकला आणि इतर अनेक गोष्टींमध्ये रस आहे. यासोबतच तिला बॅडमिंटन खेळायलाही आवडते.
सेंकड रनर शिनाता चौहान उत्तर प्रदेश मधील आहे. शिनाताचे वय फक्त २१ वर्षे आहे. शिनाताला व्यक्त व्हायला आवडते. तिला संगीत ऐकायला आणि चाहत्यांशी बोलायला आवडते. तिला स्वतःची काळजी घेण्यासारख्या क्रियाकलाप आवडतात.