एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुसंख्य बंडखोर आमदारांनी भाजपसोबत युती केली आणि सरकार स्थापन केलं. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले, आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठी गळती लागली.
या सर्व प्रकरणाचा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का सहन करावा लागला. अशा स्थितीत शिवसेनेला पुन्हा सावरण्यासाठी, शिवसैनिकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली.
आता शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये सुरू केलेल्या दौऱ्याला सर्वत्र आश्चर्यजनक प्रतिसाद मिळत आहे. दौऱ्यात मोठ्या प्रमाणात जमणारी गर्दी अजूनही सामान्य शिवसैनिक मातोश्रीशी एकनिष्ठ असल्याचं अधोरेखित करीत आहे. त्यामुळे आता ही गोष्ट बंडखोरांना अस्वस्थ करीत आहे.
शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदर बाहेर पडले तरी सामान्य शिवसैनिक शिवसेनेसोबतच राहत असल्याचा इतिहास आहे. त्याचेच काहीसे प्रत्यंतर आदित्य ठाकरे घेत असलेल्या शिवसंवाद यात्रेतून समोर येत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे काढून विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आदित्य यांची शिवसंवाद यात्रा आतापर्यंत गेली असून कुठे भर पावसात, कुठे आगमनास चार तासांचा उशीर होऊनही स्वागतासाठी थांबून राहिलेली गर्दी शिवसेनेसाठी दिलासादायक ठरली आहे.
दौऱ्यात त्या त्या ठिकाणच्या बंडखोरांवर आरोप, टीका होणे साहजिकच असले तरी प्रत्येक ठिकाणच्या जाहीर सभांमध्ये गद्दार हा समान धागा असल्याने आदित्य यांच्याकडून त्यावरच अधिक अधिक भर दिला जात आहे. बंडखोरांच्या गद्दारीचा उल्लेख केल्यावर गर्दीकडूनही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे.