गद्दारांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर देणार नाही, तेवढी त्यांची लायकी नाही, आदित्य ठाकरे संतापले

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करत काही आमदारांसह भाजपशी युती केली, आणि राज्यात सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेनेचे शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गट असे दोन गट निर्माण झाले. सध्या या दोन गटात आपापसात वाद प्रतिवाद होताना दिसतात.

बंडखोर नेत्यांवर कट्टर शिवसैनिक हल्लाबोल करत आहेत. अशातच, आज नाशिकच्या मनमाड येथे शिवसंवाद यात्रेच्या व्यासपीठावर बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी देखील बंडखोर नेत्यांना आणखी एकदा खडसावलं आहे. बंडखोर नेत्यांना गद्दार म्हणून हिणवलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, चांगला मुख्यमंत्री, चांगला माणूस, बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपूत्राला खुर्चीवरून बाजूला करून त्याठिकाणी आपण बसायचे, गद्दारी करायची, त्यांच्या पाठीत खंजीर का खुपसायचा, हा विचार त्यांच्या मनात का आला असेल, हाच प्रश्न मला परतपरत पडतो.

त्यांचा नेमका विचार काय असेल, ते मला कळत नाही. ज्या माणसाने आपल्याला ओळख दिली, कठीण काळात आपल्याला साथ दिली, तुम्हाला तिकीट दिलं, तुमच्यासाठी प्रचार केला, त्याच्यात पाठीत तुम्ही खंजीर का खुपसला, या प्रश्नाचे उत्तर मला द्या असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच म्हणाले, गेली अडीच वर्षे मी एक आमदार, मंत्री आणि मुलगा म्हणून घरात असताना उद्धव ठाकरे साहेबांना काम करताना पाहिलं आहे. उद्धव साहेब दिवसातील २४ तास जनतेसाठी काम करायचे. अडीच वर्षातील प्रत्येक क्षण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेचला आहे.

काहीवेळा मी आईकडे जाऊन भांडायचो देखील. मला हे त्यांना अनेक गोष्टी सांगायच्या होत्या, पण उद्धव ठाकरे सतत मिटिंगमध्ये, कामात व्यग्र असायचे. मी जेव्हा त्यांच्याशी बोलायला जायचो तेव्हा ते म्हणायचे की, कामाचं बोल, राज्याबद्दल बोल, असे ते म्हणाले.

पुढे म्हणाले, मी गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते. तुम्ही गद्दार नसतात तर मी तुमच्या आरोपांना, प्रश्नांना उत्तरं दिली असती. शिवसैनिकांनी प्रश्न विचारले तर मी त्याला उत्तर दिलं असतं. तुम्ही पहिले गद्दारी का केली, याचं उत्तर द्या असं म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना चांगलंच खडसावलं.