एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी बंड करत भाजपसोबत युती केली. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर शिवसेनेला मोठी गळती सुरू झाली. शिवसेनेला उभारी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बैठकांचा सपाटा लावला.
आदित्य ठाकरे देखील प्रचंड सक्रिय झाले आहेत. त्यांनी निष्ठा आणि शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे सुरू केले आहेत. मात्र, आदित्य ठाकरे यांची आता तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे त्यांनी त्यांचा जळगाव दौरा देखील रद्द केला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या अंगात त्राण नाही, डोळे थकले आहेत, त्राण नसताना देखील शिवसैनिकांसमोर आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे गटावर चांगलेच बरसल्याचे सांगितले जात आहे. शेकडो पदाधिकाऱ्यांनी युवासेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाला खुद्द आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरेंनी जोरदार भाषण केलं.
आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री कोण हेच कळायला मार्ग नाही. कधी चिठ्ठी लिहिली जाते, कधी माईक खेचला जातो. हे सगळे नाटक सुरू असताना तरुणांनी प्रश्न विचारणे गरजेचे आहे. हे सरकार नक्की कोणाचे आहे? असा प्रश्न तरुणांनी विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.
राज्यात २ लोकांचे जम्बो कॅबिनेट आहे. राज्यात पूर, अतिवृष्टी आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, या सगळ्याला उत्तर देण्यासाठी सरकार कुठयं? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी शिवसैनिकांना केला. शिवसैनिकांना संबोधित करण्याआधीच आदित्य ठाकरेंनी सांगितले की, माझ्या अंगात ताप आहे, तुम्हाला त्रास होऊ नाही यासाठी मी मास्क बांधले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिळखिळे केल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यभरातील नेते- पदाधिकारी- कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन आणि हाती शिवबंधन बांधून ठाकरेंना साथ देण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.