काल एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अनेक गौप्यस्फोट केले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपसोबत जाणार होते असा दावा त्यांनी केला. या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली. त्यावर आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, गौप्यस्फोट करतायत, करू द्या. पण, तीन पक्ष बदलून झाल्यानंतर चौथ्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकांवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडतो. शिवसंवाद यात्रेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत यांचे कारणं बदलेली आहेत.
दरम्यान, नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असं गंभीर वक्तव्य केसरकर यांनी काल केलं. आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जात आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता.
ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात ते यामुळं दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्य़ेष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळं मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे.
पुढच्या काळात उद्धव साहेबांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली आणि जे काही मला उद्धवसाहेबांच्या आणि पंतप्रधान मोदींच्या बोलण्यातून समजत होतं की, खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख कसा असावा, हे पंतप्रधान महोदयांनी त्याठिकाणी दाखवून दिलं. तर मोदींशी संबंध जपण्यास ठाकरेंनी तयारी दाखवली होती.
१२ आमदारांचं निलंबन झालं तेव्हा भाजपसोबत बोलणी सुरु होती. नारायण राणेंचा त्याचवेळी केंद्रात समावेश झाला. राणे केंद्रात गेल्याचं ठाकरेंना आवडलं नाही आणि बोलणी रखडली, असंही केसरकरांनी सांगितलं आहे. काल केसरकर यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होत आहे.