कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवरून सुरू झालेला वाद थांबताना दिसत नाही. हा वाद आता देशाच्या विविध भागात पसरला आहे. याबद्दल विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच, अभिनेत्री सोनम कपूरने देखील या वादावर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.
गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी कर्नाटकातील उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये हिजाब परिधान केलेल्या सहा विद्यार्थिनींना वर्गात जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने वाद सुरू झाला होता. यानंतर महाविद्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली. मोठमोठे सेलिब्रिटी या प्रकरणी आपापली मते मांडत आहेत आणि याच दरम्यान सोनम कपूरच्या वक्तव्याची खूप चर्चा होत आहे.
बॉलीवूडमध्ये आपले स्पष्टपणे मत मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनम कपूरने फार कमी शब्दात आपले मत मांडले आहे. सोनमने इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटोंचा कोलाज शेअर केला आहे, ज्यात एक फोटो पगडी घातलेल्या पुरुषाचा आहे आणि दुसरा फोटो हिजाब घातलेल्या महिलेचा आहे.
या फोटोसोबत सोनम कपूरने लिहिले आहे की, ‘शीख तरुण पगडी घालू शकतात, तर मुस्लिम महिला हिजाब का नाही?’ सोनम कपूरने हिजाबच्या अँगलची पगडीशी तुलना करून त्याला नवा ट्विस्ट दिला आहे. अनेकांनी तिच्या या पोस्ट बद्दल सहमती दर्शवली आहे, तर काहींनी विरोध देखील केला आहे.
मात्र, सोनम कपूर ही एकमेव अभिनेत्री नाही जिने हिजाबबाबत मत व्यक्त केले आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी देखील या वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे. हेमा मालिनी या म्हणाल्या की, “शाळा या शिक्षणासाठी असतात आणि तेथे धार्मिक बाबी घेऊ नयेत. तसेच प्रत्येक शाळेत एक गणवेश असतो ज्याचा आदर केला पाहिजे, शाळेच्या बाहेर तुम्हाला हवे ते घालता येतेच.”
https://twitter.com/ANI/status/1491373261862555648?t=rPO0bmLltdRWiVN4W6Frdg&s=19
अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आणि हिजाब घातलेल्या मुलीसमोर घोषणाबाजी करणाऱ्या कर्नाटकातील मुलांच्या विरोधात राग व्यक्त केला. तिने ट्विटमध्ये लिहिले की, ‘तुमच्या मुलांचे चांगले पालनपोषण करा. घाणेरड्या, भ्याडांच्या झुंडीने मिळून एकट्या महिलेवर हल्ला करून त्याला अभिमान वाटतो का? लाजिरवाणी गोष्ट आहे, हे लोक काही वर्षांत बेरोजगार, अधिक निराश आणि गरीब होतील. किती वाईट संस्कार आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात सहानुभूती नाही. मी तुमच्यासारख्या लोकांवर थुंकते.’ असं तिनं ट्विट केलं आहे.