‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ फेम अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) एक आनंदाची बातमी दिली आहे. मृणालच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार असून याबाबत तिने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. मृणालची ही बातमी समोर येताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
मृणालने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये लहान बाळाचे कपडे, शूज आणि टेडी बिअर दिसून येत आहे. त्यातील कपड्यांवर Coming Soon असे लिहिलेले दिसत आहे. फोटो शेअर करत मृणालने लिहिले की, आम्ही ठरवलंय की, आता झोपायचं नाही, स्वतःसाठी जास्त वेळ द्यायचा नाही किंवा स्वच्छ घरात राहायचं नाही..!!! कारण आमच्या आनंदाचा गठ्ठा लवकरच येणार आहे.
मृणालने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. चाहत्यांसोबत अश्विनी कासार, अभिज्ञा भावे, श्रेया बुगडे, अक्षया गुरव, सावनी रविंद्र, जुई गडकरी, सुरुची अडारकर, धनश्री काडगावकर, पियुष रानडे यांच्यासोबत इतर अनेक सेलिब्रिटीही कमेंट करत मृणालला शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, मृणालने ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेद्वारे मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले होते. या मालिकेत ती अभिजीत खांडकेकरसोबत दिसली होती. मालिकेतील अभिजीत आणि मृणालच्या जोडीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. या मालिकेनंतर ‘ती तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘हे मन बावरे’ यासारख्या मालिकेतही काम केले.
मृणालच्या पतीचे नाव नीरज मोरे असे आहे. नीरज मोरे हा मुळचा पुण्याचा असून तो नोकरीनिमित्ताने अमेरिकेत स्थायिक आहे. २५ फेब्रुवारी २०१६ रोजी मृणाल आणि नीरजने लग्नगाठ बांधली होती. तर लग्नानंतर मृणाल पतीसोबत अमेरिकेतच राहू लागली.
महत्त्वाच्या बातम्या :
मराठमोळ्या अभिनेत्रीचा स्पेनमध्ये डंका; प्रभावशाली अभिनेत्रींच्या चर्चासत्रात झाली सहभागी, म्हणाली..
लाईव्ह शोमध्ये पती हर्ष म्हणाला असं काही की भारतीला कोसळले रडू, पहा व्हायरल व्हिडीओ
मराठी कलाकार लता दीदींच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? अभिनेत्रीने दिलं ‘हे’ उत्तर, पोस्ट चर्चेत