Annu Kapoor : बॅंक कर्मचारी बनून अभिनेता अन्नू कपूरला फसवले; तब्बल ‘इतक्या’ लाखांना लागला चूना

सरकारी संस्था, बँका, पतपेढ्या, तसेच इन्शुरन्स संस्था यांच्याकडून वारंवार सायबर क्राइमपासून सावध राहण्याच्या सुचना मिळतात. मात्र, अजूनही अनेकजण सायबर क्राइमचा शिकार बनतात. अशिक्षित व्यक्तीच नाही तर सुशिक्षित व्यक्तींना देखील याचा फटका बसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

असाच काहीसा प्रकार आता बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांच्याबाबत घडला आहे. सायबर फ्रॉडमध्ये त्यांचे तब्बल ४ लाख ३ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. बँक कर्मचारी असल्याची बतावणी करत भामट्यांनी अन्नू कपूर यांना फसवलं आहे.

माहितीनुसार, अन्नू कपूर यांना गुरुवारी २९ सप्टेंबर रोजी बँक कर्मचारी म्हणून एका फसवणुकदाराचा फोन आला होता. त्याला त्यांच्याकडून केव्हायसी फॉर्म पूर्ण करवून घ्यायची होती. यानंतर अन्नू यांनीही त्यांच्या बँकेशी संबंधित सर्व माहिती आणि ओटीपी त्या व्यक्तीला सांगितला.

त्यानंतर या अज्ञात व्यक्तीने अन्नू यांच्या बँकेतून ४ लाख ३६ हजार रुपये काढून इतर दोन बँकेत ट्रान्सफर केले. अन्नू यांना याबाबत समजताच त्यांनी ओशिवारा पोलीस स्थानकात याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी यासंदर्भात सायबर क्राईम डिपार्टमेंटशी संपर्क साधला.

अन्नू कपूर यांनी लवकरात लवकर पाऊले उचलल्यामुळे त्यांना ३.०८ लाख रुपये परत मिळाले. याव्यतिरिक्त आता पोलिसांनी भारतीय दंडविधान संहितेच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलीस अन्नू कपूर यांना फसवणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

सध्या सायबर क्राईमचे प्रमाण अधिक वाढलं आहे. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे नेहमी सतर्क राहणं आवश्यक आहे. कोणालाही बँक डिटेल्स देण्याआधी त्या संदर्भात विचार करणं, संबंधित माहिती मागणाऱ्या व्यक्तीच्या डिटेल्स जाणून घेणं आवश्यक आहे.