मुलाने नवीन चारचाकी गाडी घेतली या आनंदात सर्व कुटुंब गाडीत बसून देवदर्शनासाठी गेले. मात्र त्यांच्यावर काळाने घात केला. रस्त्यात गाडीचा अपघात झाला आणि वडिलांसह चुलत्यांचा मृत्यू झाला, तर कुटुंबातील इतर सदस्य गंभीर जखमी आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाटा येथे हा भीषण अपघात झाला. ज्यांच्या चारचाकीचा अपघात झाला ते कुटुंब माण तालुक्यातील कळसकरवाडी येथील रहिवासी आहेत. सविस्तर माहिती म्हणजे, आनंदराव शिवराम पवार यांचा मुलगा स्वप्नील पवार याने १५ दिवसांपूर्वी नवीन चारचाकी गाडी घेतली.
या गाडीची सोमवारी कुटुंबीयांनी पूजा केली. पूजा झाल्यानंतर गाडीत घेऊन सर्वांना देवदर्शनाला नेण्याचं स्वप्नीलचं स्वप्न होतं. नियोजन झालं, आणि कुटूंबातील सर्वजण देवदर्शनाला गाडीत निघाले. गाडीत स्वप्नील आणि त्याची आई उषा पवार, तसेच चुलते माणिक पवार, स्वप्नीलचे वडील होते.
तुळजापूरला भवानीमातेचे व पंढरपूरला विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर आज हे सर्व जण जोतिबाच्या दर्शनाला वाडी रत्नागिरीला निघाले होते. काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत होते.
मिरजच्या दिशेने जाताना नागज फाटा येथून काही अंतरावर गणेश पेट्रोल पंपासमोर गाडी आली असता चालक स्वप्नील पवार याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने मालवाहतूक करणाऱ्या जागेवर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती की, ड्रायव्हर सीटच्या डाव्या बाजूला बसलेल्या स्वप्नीलच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. स्वप्नील आणि स्वप्नीलची आई यात गंभीर जखमी झाले. तर चुलते माणिक पवार यांचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला. या भीषण अपघाताने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं.