Share

टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या दोन मुलींचा समावेश; मुलींची प्रमाणपत्र केली रद्द

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे आता सिल्लोडपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. परीक्षेत अपात्र असणाऱ्या ज्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते, यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची देखील नावं समोर आली आहेत.

परीक्षा परिषदेकडून यादी जाहीर करण्यात आली आहे, यामध्ये त्या लोकांची नावं आहेत, जे अपात्र होते मात्र या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. परंतु, सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे प्रमाणपत्र अद्याप मिळाले नव्हते.

या यादीत आता अब्दुल सत्तार यांच्या मुली हिना आणि उजमा यांची नावे असल्याचे समोर आले आहेत. या दोघींचीही प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचेही समजत आहे. मात्र या प्रकरणाबद्दल अद्याप अब्दुल सत्तार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हिना आणि उजमा या २०२० मध्ये अपात्र ठरल्या आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे. उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून कळालेलं नाही.

दरम्यान, पुणे सायबर सेल पोलिसांनी टीईटी परीक्षेचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. या प्रकरणात तपास करत असताना २०१९-२० च्या टीईटी परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थ्यांना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील सात हजार ८०० परीक्षार्थी अपात्र असतानाही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मध्ये पैसे देऊन पात्र ठरलेल्या सात हजार ८०० उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पोलिस व शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती. त्यामध्ये उमेदवारांच्या ओएमआर शीटमध्ये फेरफार, गुण वाढवून देणे आणि थेट प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले होते.

पैसे घेऊन पात्र असल्याचे प्रमाणपत्र मिळविलेल्या सात हजार ८०० जणांची यादी पुणे सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाला दिली होती. माहितीनुसार, अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून या संस्थांमध्येच या मुलीही सेवारत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीच वाढण्याची शक्यता आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now