महाराष्ट्रात ‘आप’ने भाजपला पाडले भलेमोठे खिंडार; थेट माजी खासदारालाच फोडले

तीन-चार महिन्यांवर असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जोरदार रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याच रणनीतीची सुरुवात म्हणून पक्षात काही महत्त्वाच्या नेत्यांचे प्रवेश होत आहेत.

दोन वर्षांवर येऊन ठेपलेली लोकसभा निवडणूक, सहा महिन्यांवर येऊन ठेपलेली गुजरात आणि हिमाचल विधानसभेची निवडणूक आणि तीन-चार महिन्यांवर असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने आता अरविंद केजरीवाल यांनी कंबर कसली आहे.

त्यातच आता काल महाराष्ट्रातील २ बड्या नेत्यांनी ‘आप’ चा झाडू हातात घेतला आहे, त्यामुळे केजरीवाल यांची रणनीती यशस्वी होत असल्याच्या चर्चा होत आहेत. वंचितच्या स्थापनेपासून प्रकाश आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे नेते, माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी काल ‘आप’ मध्ये प्रवेश केला.

तसेच भाजपचे माजी खासदार, बंजारा ओबीसी समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनीही आम आदमी पक्षाचा झाडू हाती घेतला आहे. काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत राजधानी नवी दिल्लीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

आम आदमी पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पक्ष प्रवेशाची माहिती दिली. त्यात आपने म्हटलंय आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या डॅशिंग नेतृत्वाने प्रेरित होऊन सर्व कानाकोपऱ्यातून चांगले लोक एकत्र येत आहेत. आज महाराष्ट्रातले प्रमुख ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.

यावेळी केजरीवाल यांच्या डॅशिंग नेतृत्वाने प्रभावित होऊन आम्ही आम आदमी पक्षात प्रवेश करत असल्याच्या भावना दोघा नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आपची जादू हळू हळू पसरायला लागली असे चित्र आता दिसत आहे. येणाऱ्या काळात आपमध्ये आणखी कोण कोण प्रवेश करणार पाहावं लागेल.