‘आई कुठे काय करते?’ (Aai Kuthe Kay Karte?) मालिकेतील अनिरूद्ध देशमुख म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते नेहमी अनेक पोस्ट शेअर करत असतात. यामध्ये कधी कधी ते त्यांच्या सहकलाकारांसोबतचे फोटो शेअर करत त्यांच्यासोबतचे अनुभव किंवा किस्सेसुद्धा सांगत असतात. तर आताही मिलिंद यांनी ‘आई कुठे करते?’ मालिकेत संजनाच्या पतीची भूमिका साकारणारे अभिनेते मयूर खांडगे यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
मिलिंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये अनिरूद्ध देशमुख आणि संजनाचा पती शेखर ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रिन कसे असतात, याबद्दल व्हिडिओद्वारे सांगितले आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले की, ‘मयूर खांडगे. ज्याच्या येण्याने चैतन्य येतं, सेटवर तो आला की वातावरणच बदलतं. त्याला चिडवायला, त्याला त्रास द्यायला, त्याला छळायला सगळ्यांनाच आवडतं’.
‘नेहमी हसतमुख आणि सतत काहीतरी घडत असतं. तो आजूबाजूला असला की सीन विषयी चर्चा असते. सीनमध्ये त्याला अजून काय काय करता येईल याचा सतत मनन चिंतन चालू असतं. बरं त्याचे सीन काही साधे सरळ सोपे नसतात शेखरचे. तो आला म्हणजे तो भडाभडा भडाभडा बोलणार. खूप बोलणार. बरं मुग्धा त्याची वाक्य पण अफलातून गमतीशीर मजा आणणारी लिहिते. आणि तो ती वाक्य खूप छान पद्धतीने घेतो पण त्याच्याबरोबर शूटिंग करत असताना मजाच येते’.
‘आई कुठे काय करते? या सिरीयलमध्ये मयूर खांडगे हा एकमेव असा कलाकार आहे ज्यांनी मुग्धाची वाक्य अनेकवेळा बदलली आहेत. बरं त्याने काही काही शब्द त्याच्या मनाची जी काय घेतलीये किंवा टाकली आहेत ते शब्द नंतर मुग्धाने वापरायला सुरुवात केली. त्यातलाच एक भन्नाट शब्द माझ्यासाठी म्हणजेच अनिरुद्धसाठी त्यांनी पहिल्याच सीनमध्ये वापरला. तो म्हणजे अन्या देशमुख. अनिरुद्धला अन्या म्हणाला त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला’.
https://www.instagram.com/p/CcHdnMJqXMi/
मिलिंद गवळी यांच्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टवर अभिनेत्री रूपाली भोसलेने कमेंट करताना लिहिले की, ‘मयुर खांडगे एक भारदस्त माणूस. पण त्या भारदस्त माणसात एक लहान बाळ आहेस तू. मयूर तू खरंच खूप अद्भुत अभिनेता आहेस. तुझ्यासोबत काम करताना एक वेगळीच मजा येते आणि वेगळीच उर्जा असते’.
‘तुझ्या शब्दांची पकड आणि त्यावर अजून काय करता येईल याचा सतत विचार करणं हे खरंच खूप भारी आहे. त्यामुळे तुझ्यासोबतचा कलाकार किंवा सीन अधिक समृद्ध होतो. मला तुझ्यासोबतचा पहिला सीनसुद्धा ठळक आठवतो. त्या वेळेला जी ऊर्जा आणि जो उत्साह होता तो आजही आहे. खरंच तुझ्यासोबत काम करणं एक वरदान आहे. कलाकार म्हणून तू अद्भुत आहेसच पण माणूस म्हणूनसुद्धा तू कमाल आहेस, तू हवा हवासा वाटतोस’.
‘मिलिंद गवळी सर बरोबर बोलले की सेटवर एक वेगळी ऊर्जा आणि वातावरण असतं जेव्हा तू असतोस. मयूर तू आई कुठे काय करते? चा आहेस. आम्ही सर्वजण तुच्यावर खूप प्रेम करतो’. रूपालीने शेवटी तळटीप देताना लिहिले की, ‘मयुर कौतुक करून झालंय. आता तुला माहितीये काय होणार आहे. त्यामुळे तुझं अजून कौतुक सेटवर करू’.
महत्त्वाच्या बातम्या : रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली? भट्ट कुटुंबीयांनी वाढवलं कन्फ्यूजन
मी असे पुरस्कार घेत नाही पण, ‘हा’ माझा पहिला अन् शेवटचा पुरस्कार; मोदींनी मंगेशकर कुटुंबीयांना स्पष्टच सांगितलं
‘भाभीजी घर पर हैं’ मध्ये 300 हून अधिक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आसिफने केला वर्ल्ड रेकॉर्ड, वाचून अवाक व्हाल