‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. मालिकेत अरूंधती या पात्राद्वारे त्यांनी सर्वसामान्य गृहिणीची भूमिका उत्तमपणे दाखवली आहे. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांकडून नेहमीच कौतुक करण्यात येते. मात्र, अरूंधतीला प्रेक्षकांसमोर उत्तमपणे सादर करण्यामागे अनेक लोकांचा पाठिंबा असल्याचे मधुराणी यांनी म्हटले आहे.
‘आई कुठे काय करते?’ या मालिकेचे चित्रीकरण मुंबईत होत असते. त्यामुळे मधुराणी यांना शूटिंगसाठी त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते. मात्र, मधुराणी म्हणतात की, कुटुंबापासून लांब असले तरी त्या त्यांच्या मुलीसाठी निश्चिंत असतात. कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्यासाठी त्यांचे पती, आई आणि इतर स्टाफ असतात. त्यामुळे त्या निर्धास्तपणे काम करू शकतात.
या सर्वांचे आभार मानण्यासाठी मधुराणी यांनी इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी या सर्वांचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘अरुंधती म्हणून आपण सर्व मला रोज ‘आई कुठे काय करते?’ ह्या दैनंदिन मालिकेत पाहता. पण मधुराणी म्हणून माझ्या व्यक्तिगत आयुष्यातही एक स्वतंत्र डेली सोप चालूच असतो . जसे अरुंधतीच्या आयुष्यात चढ उतार येतात तसे माझ्याही आयुष्यात चालू असतात’.
‘गेले २ वर्ष मी ही मालिका करतेय. शूट मुंबईत असतं आणि माझी मुलगी आणि नवरा पुण्यात…! स्वरालीला मी खूप खूप दिवस भेटत नाही. तिच्या आयुष्यातल्या काही छोट्या पण निरागस आनंदात मी नसते. कधी तिच्या छोट्या मोठ्या आजारपणात मी नसते. कधीकधी मी २० /२० दिवस तिला भेटू शकत नाही. काम करताना हे सल आणि मुलीची ओढ आणि आठवण सतत माझ्याबरोबर असते’.
पुढे मधुराणी यांनी त्यांचे पती आणि मुलीचा सांभाळ करणाऱ्या स्टाफचे कौतुक करत लिहिले की, ‘पण तिची काळजी अशी नसते कारण प्रमोद त्याचे व्याप सांभाळून अतिशय मायेने सगळं करतो. पण ह्यात अतिशय मोलाचा वाटा आहे तो आमच्या support स्टाफचा’.
‘स्वरालीला शाळेसाठी तयार करणे, नेऊन सोडणे (तिची शाळा व्यवस्थित ऑफ line सुरू आहे … त्याबद्दल नंतर लिहीन), तिच्या आवडीचं खायला करणे, खायला घालणे, तिच्याशी खेळणे, तिची नाटकं सहन करणे, तिच्या इतर activities साठी पाठवणे ही सगळी आणि त्याहीपेक्षा कितीतरी जास्त काम ही सगळी मंडळी अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने करतात. म्हणून मी निर्धास्तपणे काम करू शकते’.
‘आपण भरतकामाची नक्षी पाहतो आणि त्याचं कौतुक करतो पण मागच्या बाजूला वेगळी वीण असते, अनेक टाके आणि गाठीही असतात त्या आधारावर ते नक्षीकाम उभं असतं. प्रमोद आहे, माझी आईही असते. त्याचबरोबर हा इतका प्रेमळ आणि खंबीर स्टाफ आहे म्हणून अरुंधती आहे. विजय, अमोल, अनिता, ज्योती, अनुराधा, आशा, ऋतुजा, अमृता.. तुम्हाला भरभरून प्रेम’.
महत्त्वाच्या बातम्या :
काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यात खुलून आलं मितालीचं सौंदर्य; शेअर केले लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीचे खास फोटो
सुरक्षारक्षकाची नजर चुकवून ‘मन्नत’मध्ये घुसला होता शाहरूखचा चाहता; पकडल्यावर म्हणाला,…
‘आई कुठे काय करते?’ मधील अरूंधतीच्या रिअल लाईफ मुलीवर होतोय कौतुकाचा वर्षाव; पहा व्हिडिओ