‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतील अनघा या भूमिकेद्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade). अल्पावधीतच अश्विनीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. आपल्या सहजसुंदर अभियनाद्वारे तिने रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांनाही खूपच भावते. यादरम्यान नुकतीच एका कार्यक्रमात बोलताना अश्विनीने मालिकेतील तिच्या भूमिकेबद्दल सांगताना तिचे काही अनुभव शेअर केले आहेत.
मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात नुकताच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्काराचा रंगतदार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी हजेरी लावली. यावेळी रेड कार्पटवर कलाकारांचा ग्लॅमरस लूकमधील हटके अंदाज पाहायला मिळाला. या सोहळ्याला अनघा अर्थात अश्विनी महांगडेनेही उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना अश्विनीने ‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील अनघा या भूमिकेबद्दल सांगितले. एका पोर्टलने ही माहिती दिली आहे.
यावळी अश्विनीने म्हटले की, ‘अनघा हा अशा मुलींचा चेहरा आहे ज्या घटस्फोटित आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरून समाजातील महिलांसाठी काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा लग्न करण्याची संधी येते त्यावेळेला स्वतःला शांत करून एका नवीन कुटुंबात समाविष्ट होणं या सगळ्या गोष्टी अनघाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. दुःख येत राहतात. परंतु त्यामुळे जगणं थांबत नाही हेच सांगण्याचं काम अनघाने केलं आहे’.
अश्विनीने पुढे सांगितले की, ‘जशा अनघाच्या आयुष्यात अनेक दुःख, संकटं आली तसाच काळ माझ्याही आयुष्यात आला जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले. अनेक चढउतार अनुभवले. त्यावेळीही त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की, आपण नेहमी कलाक्षेत्रासाठी स्वतःला वाहून न्यावं. जर मी हे करत नसते तर मी नक्कीच डिप्रेशनमध्ये गेले असते. तुम्ही दुःखी असाल, तुमच्यावर कितीही मोठं संकटं जरी आलं तरी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही काम सोडू नका’.
‘तुम्ही जितके कामात असाल तितके गुंतून राहता आणि वाईट विचार तुमच्यापासून दूर जातात. अनघाच्या भूमिकेमुळे मला चांगली लोकप्रियता मिळाली. मी नेहमी दौऱ्यावर असते. काही सामाजिक कार्यात गुंतलेली असते. त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेचा सेट हेच माझ्यासाठी घर आहे. तिथे मी काम आटोपल्यावर निवांत झोप घेऊ शकते’, असेही अश्विनीने यावेळी सांगितले.
दरम्यान, स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यादरम्यान अश्विनीने मालिकेतील सासू अरूंधती अर्थात मधुराणी गोखले प्रभूलकर यांच्यासोबत एक स्पेशल डान्स केला आहे. तर हा दैदिप्यमान सोहळा रविवार ३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :