स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळण्यासोबतच प्रत्येक पात्रालाही प्रेक्षक खूप पसंती देत असतात. नुकतीच या मालिकेने ६०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्ताने मालिकेतील अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर करत रसिक प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यासोबतच अनिरूद्ध या भूमिकेबद्दल त्यांनी एक पोस्टसुद्धा लिहिली. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्यासोबत अरूंधती देशमुख अर्थात मधुराणी गोखले-प्रभुलकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘६०० भाग पूर्ण झाले… ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतल्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हा मायबाप प्रेक्षकांचे अगदी मनापासून खूप खूप आभार’.
‘प्रेक्षकांनी ही मालिका अगदी सुरुवातीपासूनच डोक्यावर घेतली, पहिल्या एपिसोडपासूनच अरुंधती देशमुख ही मनाला भावली, प्रेक्षकांच्या मनात तिने घर केलं आणि अगदी ६०० एपिसोडनंतर सुद्धा मनात रुजली, बहरली, फुलली’.
‘पहिल्याच एपिसोडमध्ये अनिरुद्ध देशमुख ती उशिरा घरी येते म्हणून तिला घराच्या बाहेर काढतो, तो प्रसंग पाहून प्रेक्षकांत बरोबर माझं स्वतः ही मन हळहळलं. मला स्वतःला अनिरुद्ध देशमुख कसा आहे तो तेव्हाच कळला, पहिल्या एपिसोडपासून ते आता ६०० एपिसोडपर्यंत ह्या अनिरुद्ध देशमुखवर अक्षरशः शिव्यांचा वर्षाव झाला, झाला काय होतोच आहे. जितके लोक अरुंधतीवर प्रेम करतात तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त अनिरुद्ध देशमुखचा तिरस्कार करतात’.
‘मला काय त्याचा फार आनंद होतो अशातला भाग नाहीये, वाईट वाटतं, कोणाला शिव्या खाणं आवडतं? अरुंधती बरोबर वादावादीचे भांडणाचे सिन झाल्यावर खरंच मनाला दुःख होतं, पण असे बिनकामाचा, फालतू व्यर्थ बडबड करणाऱ्या अनिरूद्ध देशमुखची भूमिका करत असतो’.
‘परत पण या ६०० एपिसोड्समध्ये अनिरुद्ध देशमुखची खूप चांगली बाजू सुधा प्रेक्षकांच्या समोर आली. मुलांवरचं प्रेम, त्यांच्या भविष्याची काळजी, घर चालवण्यासाठी कष्ट करणे, आई-वडिलांवरचं प्रेम, चूक कबूल करणं, कुटुंबाला महत्व देणं, खूप अशा त्याच्या चांगल्या गोष्टीसुद्धा समोर आल्या’.
‘आई कुठे काय करते’ची पटकथा नमिता वर्तक लिहिते, ती जेव्हा मला म्हणाली की, मला तुझ्यामध्ये अनिरुद्ध दिसतो. नंतर मी आत्मपरिक्षण करायला सुरुवात केली. आणि खरंच आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माझ्यात अनिरुद्ध देशमुख कुठून कुठून भरलाय, तो मलाच कधी दिसला नव्हता. आत कुठेतरी दडून बसला होता. हळूहळू डोकं बाहेर काढायला लागला. नमिताचे खूप आभारी, मला अनिरुद्ध दिल्याबद्दल आणि माझ्यातला अनिरुद्ध दाखवल्याबद्दल’.
‘कारण मला माहिती आहे जितका माझ्यातला अनिरुद्ध राक्षस आतून बाहेर येईल तितकाच तो मला एक चांगला माणूस बनवत जाईल. कदाचित म्हणून प्राणसाहेब, अमरीशपुरी, अमजद खान, राजशेखर, निळूभाऊ फुले ही माणसं अतिशय चांगली होती, प्रेमळ होती, सज्जन होती’.
‘त्यांच्यात आतला राक्षस पडद्यावर बाहेर आला आणि मनाने ते निर्मळ आणि स्वच्छ झाले. अनिरुद्ध देशमुख ही नकारात्मक भूमिका जरी मी करत असलो तरीसुद्धा माझ्यातली सकारात्मकता कधीही कमी होणार नाही. ६००च्या पुढे’.
महत्त्वाच्या बातम्या :
‘पुणे-मुंबईची भाषा ही महाराष्ट्राची भाषा नाही’, नागराज मंजुळे असं का म्हणाले?
काही मराठी कलाकारच स्वतः हिंदीत बोलतात तेव्हा ते ऐकून.., अतुल गोगावलेंनी व्यक्त केली खंत
‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राला मिळाली चित्रपटात काम करण्याची संधी, लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार?