दुकानदाराने किंवा एखाद्या व्यक्तीने १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार दिल्याचे तुम्ही अनेकदा अनुभवले असेल. असाच काहीसा प्रकार परभणी येथील विवेक मुंदडा यांच्यासोबत घडला आहे. मात्र, त्याचे १० रुपयाचे नाणे चक्क युनियन बँकेच्या परभणी शाखेने स्वीकारले नसल्याने समोर आले आहे.
युनियन बँकेच्या परभणी शाखेने त्यांच्याकडून १०रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार दिला आहे. यावर त्यांनी वरिष्ठांकडे याबाबत तक्रार दिली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी अखेर ग्राहक मंचाकडे धाव घेतली. त्यांना याबाबत माहिती दिली.
यावर ग्राहक मंचाने तातडीने पाऊल उचलत १० रुपयांचे नाणे न स्वीकारणाऱ्या संबंधित बँकेला १५०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच हे पैसे मुंदडा यांना देण्याचे आदेश दिले. तुमच्याबाबत देखील कधी असे घडले तर नक्कीच तुम्ही देखील याबाबत तक्रार देऊ शकता.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाण्याविषयी बरेच नियम आहेत. कदाचित ते नियम तुम्हाला माहित नसतील. काही नियम तोडल्यास तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. तर चला जाणून घेऊयात भारतीय नाण्याविषयी काही माहिती, जी तुमच्यासाठी ठरू शकते फायदेशीर.
जर कोणी चलनात असणारे नाणे घेत नसेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतो. आरोपी व्यक्तिविरोधात भारतीय दंड संहितानुसार कारवाई करण्यात येईल. रिझर्व्ह बँकेमध्येही तुम्ही याबाबत तक्रार करू शकता. भारतीय चलन न स्वीकारल्यास संबंधितांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम १२४’अ’ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
नाणे अधिनियम ९नुसार, जर तुम्हाला वाटत असेल समोरील व्यक्तीने बनावट नाणं दिले आहे. तर तुम्हाला त्या नाण्याला नष्ट करण्याचा अधिकार आहे. अशा स्थितीमध्ये नाणे तोडणाऱ्याचे नुकसान होईल. जर कोणी नाणे तोडले तर त्याला बाजारमुल्याएवढा दंड भरावा लागेल.