शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघाती मृत्यू झाला. मात्र, मेटे यांचा हा अपघात होता की घातपात यावर सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत. मेटे यांच्या मृत्यूप्रकारणी रोज नवीन नवीन माहिती समोर येत आहे.
ऑगस्ट ३ रोजी विनायक मेटे यांच्या गाडीचा अनोळखी व्यक्तींनी पाठलाग केल्याचं निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर मेटेंच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या गाडीच्या मालकाची रांजणगाव पोलीसांनी चौकशी केली. मात्र, आता हा पाठलाग केवळ गैरसमजातून झाल्याचं या गाडीच्या मालकाने पोलिसांना सांगितलं आहे.
या चौकशीत कार मालक संदिप वीरनं तो पाठलाग केवळ गैरसमजातून झाला असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे, अशी माहिती रांजणगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच बातम्या पाहिल्यानंतर संबंधित पाठलाग करणाऱ्या गाडीचा मालक स्वतः पोलीस चौकीत आल्याचं सांगितलं.
पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेटेंच्या गाडीचा पाठलाग केलेली गाडी रांजणगाव पोलीस हद्दीतली होती. त्यामुळे बातम्या पाहिल्यानंतर त्या कारचा मालक आणि त्यादिवशी गाडीत असणारे लोक स्वत:हून पोलीस स्टेशनला आले. तेव्हा त्यांचे जबाब नोंदवले.
कार मालक संदीप वीर यांनी सांगितले की, त्यादिवशी माझ्या चुलत भावाचा वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही शिरुरला गेलो. पण काही मित्रांनी आग्रह केला की तुम्ही परत घरी या त्यामुळे आम्ही घाई घाईने परत निघालो. स्पीडमध्ये आम्ही येत होतो. काही गाड्यांना ओव्हरटॅक केलं.
तसेच सांगितले की, हॉर्न वाजवले म्हणून त्यांचा गैरसमज झालेला असू शकतो की आम्ही पाठलाग केला. पण आम्ही ते जाणून बुजून केलं नाही. तर ते अनावधानाने झालं, असे कार मालकाने पोलिसांना ३ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेचे स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे आता मेटे यांचा अपघातच होता की, आणखी काही नवीन गोष्टींचा उलगडा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.