कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे एके काळी प्रचंड प्रसिद्ध होते. त्यांच्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य केलं होतं. पण काळाच्या ओघासोबत ते कलाविश्वापासून आपोआप दूर झाले. यामधलाच एक अभिनेता म्हणजे, चंद्रचूड सिंह होय.
चंद्रचूड सिंह असा अभिनेता आहे, ज्याने खूप सारे चित्रपट केले मात्र, त्याला अपेक्षित असं यश मिळालं नाही. ‘माचीस’ चित्रपटात तब्बूसोबत दमदार अभिनय करणारा हा अभिनेता अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला. ‘माचीस’ व्यतिरिक्त, चंद्रचूड ‘क्या कहना’ आणि ‘जोश’ सारख्या हिट चित्रपटांसाठी तो लक्षात ठेवला जातो.
जोश या चित्रपटासाठी त्याचे विशेष कौतुक झाले. या चित्रपटात आमिर खानला घेण्यात येणार होतं, पण आमिरने त्यासाठी नकार दिला होता. चंद्रचूड सिंह याचा जन्म ११ ऑक्टोबर १९६८ रोजी झाला. त्याची आई ओडिशाच्या बालंगीरच्या महाराजांची मुलगी होती आणि वडील बलदेव सिंग उत्तर प्रदेशातील अलीगढच्या खैरा मतदारसंघातून खासदार होते.
चंद्रचूडने १९९६ मध्ये ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. काही हिट चित्रपट दिल्यानंतर चंद्रचूड बॉलिवूडपासून दुरावला. एक काळ असा होता की या चॉकलेटी मुलाचे हजारो चाहते होते. चंद्रचूड यास ‘माचीस’ चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
सुमारे डझनभर चित्रपट केल्यानंतर चंद्रचूड सिंह अचानक चित्रपटांमधून गायब झाला. एका मुलाखतीत त्याने चित्रपटांपासून दूर जाण्याचे कारणही सांगितले. तो म्हणाला की, मला काही चांगल्या भूमिका करायच्या होत्या. मला अनेक ऑफर्स आल्या पण मी वेगळ्या भूमिकेची वाट पाहत होतो. मात्र तशी भूमिका भेटली नाही, त्यामुळे मी चित्रपटांपासून दूर झालो.
२००० मध्ये चंद्रचूडचा भीषण अपघात झाला होता. तो गोव्यात बोट रायडिंग करत होता. त्यावेळी हा अपघात झाला आणि त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात झाला तेव्हा त्याच्या अनेक चित्रपटांची शूटिंग सुरू होती. फिजिओथेरपी वगैरे केल्यानंतर चंद्रचूड चित्रपटांच्या शूटिंगला परतला. पण त्याचा हात पूर्णपणे बरा झाला नव्हता. यानंतर चंद्रचूडची कारकीर्द ठप्प झाली. या अपघातातून सावरण्यासाठी चंद्रचूडला सुमारे १० वर्षे लागली.
दरम्यान, चंद्रचूडच्या घरची आर्थिक परिस्थितीही हलाखीची झाली. २०१२ मध्ये त्यांनी ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. चंद्रचूडला त्याच्या छोट्या कारकिर्दीमुळे सर्वजण विसरले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तो दून विद्यापीठात संगीत शिक्षक होता. सध्या त्याने आर्या या वेबसिरीजद्वारे पुनरागमन केले आहे. यामध्ये तो सुष्मिता सेनच्या पतीच्या भूमिकेत दिसला आहे.