राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे संजय घाडीगावकर यांनी त्यांच्या १५० समर्थकांसह काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय घाडीगावकर यांनी हातात शिवबंधन बांधलं आहे. या प्रवेशाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. या पक्ष प्रवेशाच्यावेळी घाडीगावकर यांनी केलेल्या विनंतीनुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाहीर सभा घेण्याचं आश्वासन दिलं आहे.
संजय घाडीगावकर यांच्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, संजय घाडीगावकर यांनी २००५ मध्ये शिवसेनेला रामराम ठोकत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर भागातून संजय घाडीगावकर हे काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
महापालिकेत काँग्रेस पक्षाच्या गटनेते पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. याशिवाय,२०१६ मध्ये किसननगर भागातील पोटनिवडणुकीत त्यांनी शिवसेनेचा पराभव करत एक उमेदवार निवडून आणला होता. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
२०१७ मध्ये ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढले. त्यावेळी त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपमधून निवडणुक लढवली होती. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, संजय घाडीगावकर यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने ठाकरे गटाने शहरात पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. आता घाडीगावकर यांचा ठाकरे गटाच्या पक्षाला किती फायदा होतो, हे येत्या काळात स्पष्ट होईल.