शिंदे गटानं अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या चिन्हाबाबत निर्णय घ्यावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली होती. शिंदे गटाच्या अर्जानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं पहिल्यांदा शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं.
त्यानंतर दोन्ही गटांना नवीन नाव आणि नवं चिन्ह सूचवण्यास सांगण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांच्याकडून चिन्ह आणि नावं पाठवण्यात आली होती. निवडणूक आयोगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आलं.
तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं. दरम्यान, पक्षाच्या चिन्हाचं महत्व लक्षात घेता दोन्ही बाजूने धनुष्यबाण मिळवण्यासाठी निवडणूक आयोगात मोठा आटापिटा केला जात आहे. अशा स्थितीत पुरंदर तालुक्यातील दादा जाधवराव यांची आठवण नक्कीच येते.
दादा जाधवराव यांनी एकाच पक्षाकडून सात वेळा सात वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवत ते आमदार झाले होते. त्यामुळे आज घडीला उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात सुरू असलेल्या चिन्हाच्या वादावर दादा जाधवराव यांनी मिळवलेल्या विजयाचे उदाहरणं हे उमेदवार सक्षम असेल तर पक्षचिन्हामुळे फार काही फरक पडत नाही, हेच सांगणारे आहे.
दादा जाधवराव यांच्याबद्दल माहिती म्हणजे, दादा जाधवराव यांचा पक्ष एकच होता पण कालांतराने त्यांची जनता पक्ष, जनता दल, जनता सेक्युलर, अशी नावे बदलत गेली. तसेच चिन्हेही बदलत गेली. समाजवादी विचारांशी त्यांची बांधिलकी होती.
दादासाहेबांनी पहिली निवडणूक १९७२ साली झोपडी चिन्हावर लढली. १९७८ साली नांगरधारी शेतकरी हे चिन्ह मिळाले. १९८० साली छत्री हे चिन्ह मिळाले. १९८५ साली नांगरधारी शेतकरी हे चिन्ह मिळाले. १९९० व १९९५ साली चक्र हे चिन्ह मिळाले.
त्यानंतर ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी हे चिन्ह मिळालं. त्यानंतर डोक्यावर भारा घेतलेली महिला हे चिन्ह त्यांना मिळाले. दादासाहेबांनी अशा विविध चिन्हांवर निवडणुका लढवल्या आणि विशेष म्हणजे त्या जिंकल्याही. मात्र ते बदललेल्या चिन्हामुळे कधी नाराज झाले नाहीत, त्यामुळे, दादासाहेब जाधवरावांच उदाहरणं शिवसेनेतील दोन्ही गटांतील कार्यक्षम आमदारांना ऊर्जा देणारेच आहे.






