बुधवारी मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा पार पडला. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी लांबून लांबून लोक आले होते. त्यातच मेळाव्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या एका शिवसैनिकाचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी बुधवारी यवतमाळहून एक शिवसैनिक निघाला होता. मात्र, त्याचा मुंबईत पोहोचण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या या शिवसैनिकाचे नाव श्रीकृष्णा मांजरे आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील हरसूल येथील आहेत.
मांजरे हे यवतमाळमधील शिवसैनिकांसह दोन दिवसांपूर्वी रवाना झाले होते. मेळाव्या दिवशी भिवंडीत त्यांनी एका ठिकाणी ब्रेक घेतला. यावेळी नाश्ता करतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी मांजरे यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
त्यानंतर काल दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव मूळ गावी हरसूल येथे रुग्णवाहिकेने आणण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीकृष्णा मांजरे यांच्या अंत्यसंस्काराला दिग्रस व परिसरातील शिवसैनिक आणि ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रीकृष्णा मांजरे यांचा मोठा मुलगा गोपाल मांजरे यांनी वडिलांना मुखाग्नी दिला. मृत श्रीकृष्णा मांजरे हे हरसूल येथील निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांच्याबाबत अधिक माहिती म्हणजे, गावातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा हिरीराने सहभाग असायचा.
तसेच दिग्रस आणि परिसरात होणाऱ्या शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमाला श्रीकृष्णा मांजरे यांची आवर्जून हजेरी असायची. तसेच बंजारा समाजाचे नेते आणि शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांचे खंदे समर्थक म्हणूनही श्रीकृष्णा मांजरे यांना ओळखले जायचे. शिवसेनेचा भगवा शेला नेहमी त्यांच्या खांद्यावर असायचा. त्यामुळे अखेरचा निरोप देताना देखील हाच शेला त्यांच्या अंगावर पांघरण्यात आला होता.